'आरएसएसच्या विचारसरणीची भीती वाटत आहे'

नाझी विचारसणीप्रमाणे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.

Updated: Aug 11, 2019, 11:27 PM IST
'आरएसएसच्या विचारसरणीची भीती वाटत आहे' title=

इस्लामाबाद : नाझी विचारसणीप्रमाणे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. त्याचसोबत संघाच्या हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती वाटतेय, असंही ते म्हणालेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही टीका केली आहे.

'नाझी आर्यनच्या वर्चस्ववादासारखा आरएसएसचा हिंदू वर्चस्ववाद काश्मीरमध्ये थांबणार नाही. यामुळे भारतातल्या मुस्लिमांवर दडपशाही होईल, आणि पाकिस्तानला लक्ष्य केलं जाईल,' असं पहिलं ट्विट इम्रान खान यांनी केलं.

यानंतर लगेचच दुसर ट्विट करत एकाकी पडलेल्या इम्रान खान यांनी जगाने याकडे नुसतं पाहून शांत बसू नये, असं आवाहनही केलं आहे. 'काश्मीरमधला कर्फ्यू आणि काश्मिरींचा नरसंहार नाझी विचारसरणीने प्रेरित झालेल्या आरएसएसच्या विचारसरणीतून होत आहे. वंश मिटवून काश्मीरचं लोकसंख्याशास्त्र बदलण्याचा हा प्रकार आहे. हिटलरने म्युनिचमध्ये केलेला प्रकार बघून जग शांत राहिलं. जग आताही तसंच शांत राहणार का? हा प्रश्न आहे,' असं इम्रान खान म्हणाले.

मोदी सरकारनं काश्मीरला विशेष दर्जा देणारं अनुच्छेद ३७० रद्द केल्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे.त्यामुळे या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी इम्रान खान यांच्याकडून अशा प्रकारचे नापाक प्रयत्न करण्यात येत आहेत. तर भाजपा नेते राम माधव यांनी पलटवार करत जगात दहशतवाद पसरवणारा पाकिस्तान किती सैरभर झाला आहे, हे यातून समजते असं वक्तव्य केलं आहे.