'... तर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करणे हाच शेवटचा उपाय'

मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी ५.७ अब्ज डॉलरच्या निधीला मंजुरी देण्यास अमेरिकी काँग्रेसने नकार दिला आहे.

Updated: Jan 10, 2019, 12:06 PM IST
'... तर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करणे हाच शेवटचा उपाय' title=
वॉशिंग्टन - अमेरिकेला लागून असलेल्या मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यास निधी उपलब्ध करून देण्यास डेमोक्रॅटिक पक्षाने नकार दिल्यास राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचा शेवटचा पर्याय माझ्याकडे उपलब्ध आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकी काँग्रेसमध्ये (संसद) डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध डेमोक्रॅटिक सदस्य यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी आणि सिनेटचे नेते चक स्कूमर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी बैठकीतून काढता पाय घेतला होता. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी ५.७ अब्ज डॉलरच्या निधीला मंजुरी देण्यास अमेरिकी काँग्रेसने नकार दिला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाले आहेत. मेक्सिकोतून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित अमेरिकेमध्ये बेकायदा घुसखोरी करतात. त्यांना रोखण्यासाठी ही भिंत खूप आवश्यक असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे. तर अशा प्रकारे भिंत उभारणे अमेरिकेसारख्या लोकशाहीप्रधान देशाला शोभत नाही. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचा त्याला विरोध आहे. 
 
अमेरिकी सरकारच्या खर्चासाठी आवश्यक निधीला काँग्रेसने पूर्णपणे मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे सरकारच्या विविध खर्चावर बंधने आली आहेत. केवळ अत्यावश्यक सेवांवरील खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भिंत उभारण्याच्या निर्णयाला प्रतिनिधीगृहातील बहुतांश सदस्यांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर नॅन्सी पेलोसी आणि चक स्कूमर यांच्यासोबत झालेल्या बैठकीतून बाहेर पडल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की ही बैठक म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय आहे. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्याच्या मागणीला तुम्ही मंजुरी देणार का, असा प्रश्न विचारल्यावर नॅन्सी पेलोसी यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे मी लगेचच बैठकीतून निघून आलो. 
 
बैठक निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करणे हाच शेवटचा पर्याय असल्याचे म्हटले आहे. जर भिंत उभारण्यासाठी ५.७ अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध करून दिला नाही. तर आणीबाणी जाहीर करण्याचा मला पूर्णपणे हक्क आहे, असे त्यांनी सांगितले. याआधी हा निर्णय का घेतला नाही, असा प्रश्न विचारल्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, चर्चेतून मार्ग निघेल, असे मला वाटले होते. तसे झाले नाही तरच मी शेवटचा पर्याय निवडण्याचा विचार केला होता.