भारत पाकिस्तानला दणका देण्याच्या तयारीत, नद्यांचं पाणी रोखणार

भारत देणार पाकिस्तानला सर्वात मोठा दणका

Updated: Jan 12, 2020, 10:35 PM IST
भारत पाकिस्तानला दणका देण्याच्या तयारीत, नद्यांचं पाणी रोखणार

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला दणका देण्याची तयारी केली आहे. भारतातून नदीच्या द्वारे पाकिस्तानला जाणारं पाणी लवकरच भारत बंद करणार असल्याची शक्यता आहे. केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं की, 'भारतातून पाकिस्तानला जाणारं पाणी रोखण्यासाठी सुरु असलेली योजना अंतिम टप्प्यात आहे. या संदर्भात अहवाल देखील आला आहे. पण आणखी काही अहवाल येण्याचे बाकी आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाकडून देखील याबाबत सहमती आली आहे.'

केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं की, आपण येणाऱ्या काळात नवा इतिहास रचणार आहोत. पाकिस्तानात जाणारं भारताच्य़ा वाट्याचं पाणी रोखण्यासाठी आपण यशस्वी होऊ. नमामी गंगा प्रोजेक्टबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, आज गंगा जगातील सर्वात स्वच्छ टॉप १० नद्यांच्या यादीत आली आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.

मोदी सरकार सिंधु जल करारानुसार रावी, ब्यास आणि सतलुज नद्यांचं पाणी हे यमुना नदीत वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारताच्या या निर्णय़ामुळे पाकिस्तानला दणका बसेल. याआधी देखील भारतात पाकिस्तानला जाणारं पाणी रोखण्याचा मुद्दा चर्चेत आला होता तेव्हा पाकिस्तान यावर सैरभैर झाला होता. पाकिस्तान याचा विरोध करत होता. 

जम्मू-काश्मीर मधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील तणाव वाढला होता. त्यानंतर पाकिस्तानकडून सतत सीमेवर फायरिंग सुरु आहे. भारतीय जवानांना देखील त्याला उत्तर देण्याचे आदेश आहेत. पाकिस्तान काश्मीर प्रकरणात संयुक्त राष्ट्रात देखील गेला होता. पण तो भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगत अनेक देश देखील भारताच्या बाजुने उभे राहिले होते.