कराची : काँग्रेसमधून निलंबित झालेले काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. कराचीमध्ये पोहोचल्यावर लगेचच मणिशंकर अय्यर यांचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं आहे. मी पाकिस्तानवर प्रेम करतो कारण मी भारतावर प्रेम करतो, असं वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे. अय्यर कराची लिटरेचर फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला गेले आहेत.
कराची लिटरेचर फेस्टिवलमध्ये अय्यर यांनी पाकिस्तानच्या धोरणांवर स्तुती केली तर भारताच्या धोरणांवर दु:ख व्यक्त केलं. बातचित करुनच भारत आणि पाकिस्तानमधला वाद सुटू शकतो, असा विश्वासही अय्यर यांनी व्यक्त केला.
एकीकडे पाकिस्तानकडून भारतावर दहशतवादी हल्ले होत आहेत. सुंजवान इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले. तर श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या निवासस्थानावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला. पाकिस्तानकडून हे हल्ले होत असतानाच मणिशंकर अय्यर यांनी हे वक्तव्य केलंय.
याआदी २०१५ सालीही अय्यर यांनी पाकिस्तानचं कौतुक केलं होतं. भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा सुरु करायची असेल तर नरेंद्र मोदींना हटवावं लागेल, असं म्हणून अय्यर यांनी वाद ओढावून घेतला होता.
अय्यर यांनी गुजरात निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख नीच म्हणून केला होता. या वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर अय्यर यांनी माफी मागितली. तसंच या प्रकरणानंतर राहुल गांधींनी त्यांचं काँग्रेसमधून निलंबन केलं. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळीही अय्यर यांनी मोदींवर टीका केली होती. निवडणुकीनंतर मोदींना चहा विकावा लागेल, असं अय्यर म्हणाले होते.