नवाज शरीफ यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केले दाखल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती बिघडली आहे.  

Updated: Oct 23, 2019, 02:19 PM IST
नवाज शरीफ यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केले दाखल title=

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना लाहोरच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्लेटलेट्स १० हजारांपर्यंत कमी झाल्या आहेत. इम्रान खान सरकारकडून योग्य ती देखभाल ठेवली जात नसल्याने त्यांची प्रकृती खराब झाल्याचा आरोप शरीफ यांच्या भावाने केला आहे. पनामा पेपर गैरव्यवहारात ते दोषी आहेत. त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. २४ डिसेंबर २०१८ पासून नवाज शरीफ जेलमध्ये आहेत. 

दरम्यान, रुग्णालयाच्या ताज्या वैद्यकीय बुलेटिननुसार नवाझ शरीफ यांची प्रकृती स्थिर आहे. पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ म्हणाले, " आम्ही आणि शरीफ कुटुंब तसेच आणि डॉक्टरही चिंतीत आहेत. त्यांच्या प्लेटलेट्स १५,००० पातळीवर पोहोचल्या आहेत. स्थानिक वृत्तानुसार नवाज शरीफ यांना सोमवारी रात्री वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला.

शरीफ यांचे भाऊ शाहबाज म्हणाले, 'शरीफ यांच्याबाबत सरकारने दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार त्यांची तब्येत खूपच खराब आहे. शरीफ यांची प्रकृती खालावत असूनही त्यांना रुग्णालयात दाखल केले जात नाही. ही इम्रान खानच्या पीटीआय सरकारची उदासीनता आहे. पीएमएल-एनचे प्रवक्ते मरियम औरंगजेब म्हणाले की, नुकत्याच झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार शरीफ फार आजारी आहेत आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांनी असा इशारा दिला की, जर आपल्या भावाबाबत काही चुकीचे घडले तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा.