आणखी एका देशाची कोरोनावर मात, आंतरराष्ट्रीय उड्डाणं ही सुरु

आणखी एका देशाने कोरोनावर पूर्णपणे मात केल्याचं जाहीर केलं आहे.

Updated: Jun 10, 2020, 11:39 AM IST
आणखी एका देशाची कोरोनावर मात, आंतरराष्ट्रीय उड्डाणं ही सुरु title=

नवी दिल्ली : जगात कोरोनाचा कहर सुरु असताना आणखी एका देशाने कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे. टांझानियाचे अध्यक्ष जॉन मागुफुली यांनी देश कोरोना मुक्त घोषित केला आहे. याची घोषणा करताना ते म्हणाले की, हे केवळ देवाच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले आहे. तरीही त्यांनी देशवासियांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

अध्यक्ष जॉन मगुफुली यांनी स्थानिक आरोग्य अधिकारी, अग्रभागी आरोग्य सेवा कर्मचारी आणि देशाला कोरोना विषाणूंपासून मुक्त करण्यासाठी प्रार्थना करणारे नागरिक यांना याचं श्रेय दिले आहे. देशाची राजधानी डोडोमा येथे असलेल्या चर्चमध्ये मगुफुली यांनी ही घोषणा केली.

मास्कपासून मुक्ती मिळाल्यामुळे त्यांनी सेलिब्रेशन देखील केलं. ते म्हणाले की, "देश आता कोरोनाच्या धोक्यातून बाहेर आला आहे आणि लोकांची भीतीही संपली आहे." गेल्या आठवड्यात, मागुफुली यांनी माहिती दिली होती की, रुग्णालयात फक्त चार कोरोना रुग्ण आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार टांझानियाने 29 एप्रिलपासून कोरोना विषाणूचा कोणताही डेटा जाहीर केलेला नाही. शेवटच्या वेळी जेव्हा कोरोनाची नोंद केली गेली होती तेव्हा तेथे 509 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यापैकी 21 जणांचा मृत्यू झाला होता. टांझानिया या आफ्रिकी देशातील बहुतेक लोकं दारिद्र्य रेषेखालील आहे.

स्थानिक डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांनी देखील टांझानियामध्ये सामाजिक अंतरांचे उल्लंघन केल्यामुळे आणि धार्मिक स्थळे उघडी ठेवल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. मे महिन्यात अमेरिकेच्या टांझानिया येथील दूतावासानेही रूग्णालयात रुग्णवाढल्यानंतर इशारा दिला होता.

राष्ट्रपती मागुफुली यांना सुरुवातीपासूनच टांझानियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी चिंता व्यक्त केली नव्हती. ते देशवासीयांना सांगायचे की, 'कोरोना विषाणूपासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करा. कोणताही विषाणू येशूच्या शरीरात टिकू शकत नाही.'

त्यांनी हे देखील म्हटलं होतं की, खराब चाचणी किटमुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. यानंतरच हा देश चर्चेत आला. या दरम्यान त्यांनी मशीद आणि चर्चमध्ये जावून प्रार्थना करण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं.

टांझानियामध्ये आता विद्यापीठे, महाविद्यालयं आणि आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळा अजूनही बंद आहेत.