बेनझीर हत्याकांड : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ फरार घोषित

पाकिस्तानात गुरुवारी दहशतवाद विरोधी न्यायालयानं जवळपास एक दशकांपूर्वी झालेल्या बेनझीर भुट्टो हत्याकांड प्रकरणी परवेज मुशर्रफ यांना फरार म्हणून घोषित केलंय. 

Updated: Aug 31, 2017, 05:11 PM IST
बेनझीर हत्याकांड : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ फरार घोषित title=

इस्लामाबाद : पाकिस्तानात गुरुवारी दहशतवाद विरोधी न्यायालयानं जवळपास एक दशकांपूर्वी झालेल्या बेनझीर भुट्टो हत्याकांड प्रकरणी परवेज मुशर्रफ यांना फरार म्हणून घोषित केलंय. 

भुट्टो हत्याकांड प्रकरणी न्यायालयानं पाच जणांची निर्दोष मुक्तता केलीय तर दोन जणांना तुरुंगात धाडण्यात आलंय. 

दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिलेल्या बेनझीर भुट्टो यांची २७ डिसेंबर २००७ रोजी रावळपिंडीत झालेल्या बॉम्बस्फोटात निर्घृणरित्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी रावळपिंडीत काल संपली. बेनझीरची हत्या झाली तेव्हा परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्रपती होते आणि ते या हत्या प्रकरणातील आरोपींपैंकी एक आहेत. ते पाकिस्तानात परतल्यानंतर याविरुद्ध सुनावणी होईल. 

बेनझीरच्या हत्येनंतर अटक करण्यात आलेले पाच आरोपी - रफाकत हुसैन, हसनैन गुल, शेर जमान, ऐतजाज शाह आणि अब्दुल राशिद तुरुंगात आहेत. आरोपींमध्ये रावळपिंडीचे तत्कालीन पोलीस प्रमुख सऊद अजीज आणि एसएसपी कुर्रम शहजाद यांचाही समावेश आहे. दोघांनाही अटक करण्यात आली होती परंतु, २०११ मध्ये त्यांना जामिनावर सोडण्यात आलं.