पुतीन यांच्याकडून मोदींसह मेक इन इंडियाचे कौतुक; म्हणाले, आपणही तेच केले पाहिजे

Putin praised PM Modi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान मित्र असल्याचे म्हटले आहे. पुतीन यांनीही मेक इन इंडियाचे कौतुक केले आहे

आकाश नेटके | Updated: Jun 30, 2023, 11:33 AM IST
पुतीन यांच्याकडून मोदींसह मेक इन इंडियाचे कौतुक; म्हणाले, आपणही तेच केले पाहिजे title=
(फोटो सौजन्य - PTI)

Vladimir Putin Hails Pm Modi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे जोरदार कौतुक केले आहे. यासोबतच पुतिन यांनी 'मेक इन इंडिया' उपक्रमाचे (Make in India) कौतुक करत पंतप्रधान मोदी यांना आपले खास मित्र म्हटलं आहे. 29 जून रोजी मॉस्को येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना पुतिन यांनी हे विधान केले आहे. माझे मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी मेक इन इंडिया ही संकल्पना सुरू केली होती ज्याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळाले आहेत, असे व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे.

मॉस्कोत झालेल्या एका कार्यक्रमात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.  भारत हा असा देश आहे, जो कंपन्यांना आपल्या देशात येऊन काम करण्यास प्रोत्साहित करतो.आमचे खास मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्षांपूर्वी मेक इन इंडियाची संकल्पना सुरू केली होती. भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम आज स्पष्टपणे दिसून येत आहे, असे  पुतिन म्हणाले आहेत.

रशियन माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, पुतीन गुरुवारी मॉस्कोमध्ये रशियाच्या एजन्सी फॉर स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह (एएसआय) द्वारे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. रशियामध्ये देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी भारताचे उदाहरण दिले. "ज्या वेळी पाश्चात्य देश रशियासोबतच्या व्यापारावर सातत्याने निर्बंध लादत आहेत, तेव्हा आपण भारतासारख्या आपल्या देशातील कंपन्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे. आमचे भारतातील आणि रशियाचे महान मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली. 'मेक इन इंडिया'चा भारतीय अर्थव्यवस्थेवर अतिशय चांगला परिणाम झाला," असे पुतीन यांनी म्हटलं. 

मेक इन इंडियाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जो चांगले काम करत असेल त्याला आपल्याकडे घेण्यात काही गैर नाही. भले काम करणारे आपण नसून आपले मित्रच आहोत, असेही पुतीन म्हणाले. यासोबतच पुतिन यांनी स्थानिक उत्पादन विकसित केल्याबद्दल आणि विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एक प्रभावी मॉडेल तयार केल्याबद्दल भारताचे कौतुक केले. आपली उत्पादने आधुनिक गुणांसह अधिक सोयीस्कर बनविण्याबाबत विचार करण्याची गरज आहे यावर पुतिन यांनी भर दिला.