अमेरिकेत 'शटडाऊन’, ऐन ख्रिसमसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला

या टाळेबंदीमुळे अमेरिकेतील सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांपुढे पेच निर्माण होणार आहे.

Updated: Dec 23, 2018, 10:52 AM IST
 अमेरिकेत 'शटडाऊन’, ऐन ख्रिसमसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला  title=

वॉशिंग्टन: अमेरिका-मेक्सिकोदरम्यानच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी पाच अब्ज अमेरिकी डॉलर मंजूर व्हावेत, ही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी अमेरिकी काँग्रेसमध्ये मंजूर न झाल्याने या महासत्तेच्या कारभाराला ताळेबंदीचा फटका बसणे अटळ आहे. या ताळेबंदीची व्याप्ती अतितीव्र नसली तरी ऐन नाताळच्या हंगामात महत्त्वाच्या अशा नऊ सरकारी खात्यांच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या मागणीवर अमेरिकी काँग्रेसमध्ये शुक्रवारी रात्रीपर्यंत खल सुरू होता. ट्रम्प यांच्या या मागणीला डेमोक्रॅटिक सदस्यांनी तीव्र विरोध केल्याने त्याबाबतचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून तांत्रिक अर्थाने अमेरिकेतील नऊ खात्यांचे ताळेबंदी सुरू झाली.  २०१८ मधील अमेरिकेतील ही तिसरी टाळेबंदी आहे. या टाळेबंदीमुळे अमेरिकेतील सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांपुढे पेच निर्माण होणार आहे. त्यांना या शटडाऊनच्या काळासाठी विनावेतन काम करावे लागेल. ऐन नाताळाच्या हंमागात ही स्थिती ओढवल्याने त्यांच्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे या वर्षातील तिसरे 'शटडाऊन' असून ते किती काळ चालेल, ते अद्याप स्पष्ट नाही. या शटडाऊनचा पहिला जोरदार फटका अमेरिकेतील शेअर बाजाराला शुक्रवारी बसला. वॉल स्ट्रीटवरील बाजाराने जबर घसरण अनुभवली. सन २००८ नंतरची ही सर्वांत मोठी घसरण होती.

'शटडाऊन' म्हणजे काय? 

अमेरिकेच्या राजकारणात, सरकारी खर्चाला मंजुरी देणारे विधेयक संसदेत पास झाले नाही. किंवा अध्यक्षांनी अशा खर्चाला परवानगी देणाऱ्या अध्यादेशावर सही करण्यास नकार दिल्यास 'शटडाऊन' होते. अशा परिस्थितीत, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले जाते किंवा विनावेतन काम करायला सांगितले जाते.