19752 कोटींची मालकीण! पिचाई-नडेलांची एकूण संपत्तीही तिच्या श्रीमंतीसमोर 'अतिसामान्य'

Indian-American CEO Richer Than Sundar Pichai, Satya Nadella: भारतीय वंशाची ही महिला एका कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षाही आहे. मागील 15 वर्षांपासून ही महिला या कंपनीचं नेतृत्व करत असून तिचा समावेश 'फोर्ब्स'च्या यादीतही करण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 15, 2023, 11:02 AM IST
19752 कोटींची मालकीण! पिचाई-नडेलांची एकूण संपत्तीही तिच्या श्रीमंतीसमोर 'अतिसामान्य' title=
पिचाई आणि नडेला यांच्या एकूण संपत्तीपेक्षाही या महिलेची संपत्ती अधिक

Indian-American CEO Richer Than Sundar Pichai, Satya Nadella: गुगलचे (Google) भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) आणि मायक्रोसॉफ्टचे (Mircrosoft) कार्यकारी अधिकारी सत्या नडेला (Satya Nadella) यांच्याबद्दल तुमच्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. या दोघांचा प्रवास खरोखरच प्रत्येक भारतीयाला प्रेकरणा देणार आहे. मात्र आज आपण अशा एका भारतीय वंशाच्या महिलेबद्दल बोलणार आहोत ज्या श्रीमंतीच्याबाबतीत या अब्जाधिशांपेक्षाही सरस आहेत. या ठिकाणी आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहोत त्यांचं नाव आहे जयश्री वी. उल्लाल (Jayshree Ullal)! जयश्री या अरिस्टा नेटवर्क्स (Arista Networks) या कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अध्यक्षा आहेत. 'फोर्ब्स'च्या (Forbes) यादीनुसार उल्लाल यांची एकूण संपत्ती 250 कोटी अमेरिकी डॉलर्स (2.5 बिलियन डॉलर्स) म्हणजेच भारतीय चलनानुसार 19 हजार 752 कोटी रुपये इतकी आहे. अमेरिकेतील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड म्हणजेच स्वबळावर श्रीमंत झालेल्या महिलांच्या यादीत जयश्री यांचा समावेश आहे. या 100 जणांच्या यादीत एकूण 4 Yejlr/ महिलांचा समावेश आहे.

यादीतील 4 भारतीय महिला कोण?

भारतीय वंशांच्या अमेरिकन नागरिक असलेल्या जयश्री उल्लाल, इंद्रा नूई, नीरजा सेठी आणि नेहा नरखेडे यांचा 'फोर्ब्स'ने अमेरिकेतील टॉप 100 सेल्फ मेड श्रीमंत म्हणजेच स्वत:च्या जोरावर श्रीमंत झालेल्या व्यक्तींच्या यादीत समावेश केला आहे. या चारही महिला अब्जाधीश आहेत. या महिला अमेरिकेतील 100 सर्वात यशस्वी उद्योजक, प्रशासकीय कारभार आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रभावशाली श्रीमंत व्यक्तींपैकी आहेत.

पिचाई, नडेला यांची संपत्ती किती?

अल्फाबेट इंक आणि गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या पिचाई यांची एकूण संपत्ती 1.31 बिलियन डॉलर्स म्हणजेच 131 कोटी अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. तर मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेला यांची एकूण संपत्ती 420 मिलियन इतकी आहे. म्हणजेच पिचाई आणि नाडेला यांची एकूण संपत्ती ही 1.7 बिलियन डॉलर्स इतकी आहे. या दोघांची संपत्ती एकत्र केली तर जयश्री यांची संपत्ती (2.5 बिलियन डॉलर्स) अधिक आहे. 

कंपनीला मिळवून दिलं यश

जयश्री वी. उल्लाल कंप्युटर नेटवर्किंग कंपनी असलेल्या अरिस्टा नेटवर्क्सच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यकरत आहेत. जयश्री या 2008 पासून म्हणजेच मागील 15 वर्षांपासून या कंपनीचं नेतृत्व करत आहेत. जून 2014 मध्ये जयश्री यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीने आपला IPO बाजारात आणला. या माध्यमातून कंपनीला अब्जावधी डॉलर्सपर्यंत आपला उद्योग वाढवता आला. याचं संपूर्ण श्रेय जयश्री यांनाच दिलं जातं. कंपनीची कोणत्याही प्रकारचा नफा कमवत नव्हती आणि त्यांच्याकडे केवळ 50 कर्मचारी होते तेव्हापासून जयश्री या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच कंपनी मजल दरमजल करत आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. उलाल या कंपनीच्या संस्थापक नसून कर्मचारी आहेत तरीही त्यांनी स्वत:च्या कष्टाच्या जोरावर एवढी संपत्ती कमवली आहे. 

दिल्लीत शालेय शिक्षण

जयश्री यांचा जन्म अमेरिकेत झाला. मात्र त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण नवी दिल्लीमध्ये पूर्ण केलं. उच्च शिक्षणासाठी त्या सॅनफ्रॅन्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये गेले. तिथे त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं.