परीक्षेत शून्य गुण मिळवूनही सुंदर पिचईंना 'तिचा' अभिमान

पाहा ती आहे तरी कोण   

Updated: Nov 24, 2019, 04:05 PM IST
परीक्षेत शून्य गुण मिळवूनही सुंदर पिचईंना 'तिचा' अभिमान
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोणताही प्रश्न पडला की, Google गुगलला विचारा असं उत्तर अनेकजण देतात. याच गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर असणाऱ्या, भारतीय वंशाच्या Sundar Pichai सुंदर पिचई यांनी सध्या सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी त्यांनी लक्ष वेधण्याचं कारणही तसंच आहे. Astrophysics ऍस्ट्रोफिजिक्सच्या एका विद्यार्थिनीच्या ट्विटची पिचईंनाही भलतीच भुरळ पडल्याचं स्पष्ट होत आहे. 

काही दिवसांपूर्वीच Sarafina Nance नामक एका विद्यार्थीनीने/ महिलेने तिच्या जीवनातील एका अशा टप्प्याविषयी ट्विटरवरुन माहिती दिली, जेव्हा तिला अपयशाचा सामना करावा लागला होता. त्या टप्प्यावर फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्राच्या अभ्यासापासून दूर होण्याचा विचारही तिच्या मनात घर करुन गेला होता. पण, तिने तसं केलं नाही. 

Sarafina Nanceचं ट्विट वाचलं असता तिने पुढे काय केलं याचा उलगडा होतो. 'चार वर्षांपूर्वी Quantum Physics क्वांटम फिजिक्सच्या परीक्षेत मला शून्य गुण मिळाले. ज्यानंतर मी प्राचार्यांना भेटून हा विषय सोडण्याचा विचार मांडला होता. आजच्या क्षणाला मी ऍस्ट्रोफिजिक्स पीएच.डी मध्ये अग्रगणी आहे आणि माझ्या नावे दोन निरिक्षण (पेपर)ही प्रसिद्ध करण्यात आले आहेत...', तिचं हे ट्विट तर लक्षवेधी ठरलंच पण, त्याचील शेवटची ओळ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. 

कोणत्याही बाबतीतील गुण हे तुम्ही अमुक एक गोष्ट करण्यास असमर्थ आहात हे ठरवू शकत नाहीत असा संदेश तिने ट्विटच्या माध्यमातून दिला. आपल्याला अवघड वाटणाऱ्या गोष्टीपासून दूर न पळता त्यावर चिकाटीने आणि जिद्दीने काम करण्याची वृत्ती ठेवत योग्य मार्गावर चालत राहिल्यास यश गवसल्यावाचून राहत नाही, हाच मंत्र जणू तिने दिला. 

तिचं हे ट्विट सोशल मीडियावर असंकाही चर्चेत आलं की, थेट गुगलच्या सीईओपदी असणाऱ्या सुंदर पिचई यांनीही त्याची दखल घेत यावर आपली प्रतिक्रिया दिली. Well said and so inspiring, 'तू अगदी योग्य बोललीस... हे अत्यंत प्रेरणादायी आहे' अशी प्रतिक्रिया देत त्यांनी तिचं ट्विट शेअर केलं. 

पिचई यांनी आपल्या ट्विटची दखल घेतल्याचं जेव्हा साराफिनाच्या लक्षात आलं तेव्हा तिने त्यांचे आभार मानत आपला आनंद व्यक्त केला. फक्त पिचईच नव्हे, तर सोशल मीडियावर अतिशय सरळ आणि सोप्या शब्दांतील मोठा आणि मोलाचा संदेश अनेकांसाठी #MotivationGoals देणारा ठरला हे खरं.