मुंबई : फुटबॉलचे सामने सहसा सर्व प्रकारच्या वयोगटातील व्यक्तींसाठी मनोरंजनाचा भरमसाट साठा घेऊन येणारे ठरतात. कारण असतं ते म्हणजे एकतर जीवतोड खेळणारे खेळाडू आणि दुसरं म्हणजे त्यांच्या तोडीस तोड असणारे प्रेक्षक किंवा क्रीडारसिक.
अशाच एका सामन्यानं सध्या साऱ्या जगाच्या नजरा वळवल्या आहेत. त्यामागे कारणंही तसंच आहे. अमेरिकेतील मियामी स्थित हार्ड रॉक स्टेडियम (Hard Rock Stadium) मध्ये घडलेल्या घटनेचं चित्रीकरण करत हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल करण्यात आला.
हजारो क्रीडारसिकांच्या उपस्थिती फुटबॉलचा सामना सुरु असताना अचानकच काहींची नजर एका मांजरीवर गेली. बऱ्याच उंचीवर ही मांजर दोन पायांच्या आधारावर लटकत होती. बस्स, मग काय ही मांजरच सामन्याच्या केंद्रस्थानी आली आणि प्रयत्न सुरु झाले, तिला वाचवण्याचे.
अतिशय धोकादायक प्रकारे ही मांजर स्टेडियमच्या एका डेकवर लटकलेली होती. सूत्रांच्या माहितीनुसार तिला एका झेंड्याच्या मदतीनं वाचवण्यात आलं. जेव्हा ही मांजर जवळपास 30 फुटांच्या उंचीवरुन खाली पडली तेव्हा खाली असणाऱ्या लोकांनी झेंडा पसरवत त्याच्या सहाय्यानं तिला त्यात झेललं आणि या मांजरीला वाचवलं.
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये लक्ष देऊन पाहिल्यास एक काळ्या- पांढऱ्या रंगाची मांजर लटकत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. इवल्याश्या मांजरीचा जीव वाचवण्यासाठी फुटबॉलचा सामना सोडून तिच्यामागे लागणाऱ्या या असंख्य जणांना या मनीमाऊनं मनापासून धन्यवाद दिले असणार यात शंका नाही.
Well this may be the craziest thing I’ve seen at a college football game #HardRockCat pic.twitter.com/qfQgma23Xm
— Hollywood (@DannyWQAM) September 11, 2021
दरम्यान, मांजरीचा जीव वाचवल्यानंतर लगेचच तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला मैदानाबाहेर सोडलं. तिला यामध्ये कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही, असंही त्यांच्याकडून सांगण्यात आल्याचं कळत आहे.