इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कोणत्याही क्षणी यादवी युद्ध भडकू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. सिंध प्रांतामध्ये प्रचंड असंतोष असून ११ विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्याविरोधात उघडलेली आघाडी अधिक भक्कम होताना दिसत आहे.
सिंध प्रांताचे पोलीस महासंचालक मुश्ताक अहमद महर यांचे निमलष्करी दलाने अपहरण केले आहे. आणि त्यांना विरोधकांच्या अटक वॉरंटवर सही करायला लावली. त्यामुळे कराचीचे सर्व पोलीस रजेवर गेले असून शहर लष्कराच्या ताब्यात आहे.
नवाज शरीफ यांची कन्या मरयम नवाज यांनी विरोधी पक्षांना एकत्र केले आहे. आगामी काळात इम्रान खान यांची डोकेदुखी वाढणार आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्ष सर्वशक्तीमान लष्कराविरोधात प्रथमच उघड भूमिका घेताना दिसत आहे.
महर यांचे अपहरण आणि विरोधी नेत्यांच्या अटकेबाबत पंतप्रधान इम्रान खान यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. दुसरीकडे लंडनमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री नवाज शरीफ यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.