ब्लॉग : रोज अनुभवसंपन्न करणारी लोकलची गर्दी

लोकलमधील गर्दीतला प्रवास आणि अनुभव

सुवर्णा धानोरकर | Updated: Mar 5, 2019, 07:15 PM IST
ब्लॉग : रोज अनुभवसंपन्न करणारी लोकलची गर्दी title=

लोकलमधली गर्दी हा शब्द ऐकला तरी भुवया उंचावतात. पण मुंबईतल्या लोकलच्या गर्दीतूनही बरंच काही शिकण्यासारखं असतं. लोकलमधल्या गर्दीतलं असंच काही वेगळेपण 'झी २४ तास'च्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर यांनी या ब्लॉगमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सुवर्णा धानोरकर, मुंबई : गर्दी कुठल्याही वेळची आणि कशीही असली तरी ती मला आवडते. त्यातून रोज काहीतरी शिकायला मिळतं. कधी उत्साह, कधी नवी फॅशन, कधी सहकार्याची भावना, कधी भांडणाचा नवा ट्रेंड, कधी नवी शिवी तर कधी अजून काहीतरी भन्नाट. ही गर्दी रानवाऱ्यासारखी सतत आसपास घोंगवात राहणारी असते. मुंबईत १० वर्षांपासून राहत असले, तरी लोकलशी माझा थेट संबंध गेल्या ५ वर्षांपासून येतो आहे. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असल्यानं दिवसभरातल्या प्रत्येक वेळेची लोकलमधली गर्दी अनुभवायला मिळते. जनरल, लेडीज आणि फर्स्ट क्लासमधली गर्दी वेगवेगळी असते. सकाळची गर्दी घाई गडबडीची आणि धांदलीची असते. कोणाला ऑफिसला उशीर झालेला, कोणाला कॉलेजला तर कोणाला शाळेला. प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं. सकाळच्या गर्दीत कॉलेज तरुणींची संख्या माझ्या वेळेत जास्त दिसते. छान तयार होऊन या मुली कॉलेजला जातात. यांच्या गप्पाही ऐकायला मला फार आवडतं. कुणाला आज उठायला उशीर झाला म्हणून सकाळीच आईचा ओरडा खावा लागलेला असतो. तर तिच्या सोबतच्या दुसरीच भलतंच काहीतरी सुरू असतं. तिचा चेहरा हिरमुसलेला. पहिली इंग्रजीत विचारते व्हॉट हॅपन्ड, व्हाय आर यू सो अपसेट?. दुसरी मैत्रीण वाटच बघत असते ही कधी विचारेल आणि मी कधी मन मोकळं करेन. दुसरीची लगेच अखंड बडबड सुरू. देख ना कल हमारा झगडा हुआ. वो उसकी फ्रेंड है ना, उसके साथ चॅट कर रहा था, और मेरा कॉल रिसिव्ह नहीं किया, तो हमारा झगडा हुआ. मध्येच तिला लक्षात येतं ही बाजूची (अर्थात मी) आपल्या गप्पा ऐकतेय. मग ती अजून हळू बोलते आणि मला पुढचं काही ऐकू येत नाही. पण त्यातही वेगळीच मज्जा असते.

भांडण झालेलं असलं किंवा परीक्षा असली तरी मुली मस्त तयार होऊनच घराबाहेर पडतात. कधी घाई झालीच तर मग लायनर, लिपस्टिक, कॉमपॅक ट्रेनमध्ये बसल्या बसल्या लावणार किंवा मग त्यांना उभं राहण्यापुरती जागा मिळाली. तरीही पुरे, तिथेही त्या त्यांचा मेकअप उरकून घेतात. लेटेस्ट फॅशन तुम्हाला मॉलमध्ये नव्हे तर लोकल ट्रेनमधल्या या मुलींकडे पाहून कळेल. हे माझं पक्कं मत. आज सतत ओरडा सुरु असतो की आजची पिढी पुस्तकं वाचत नाही. पण ज्यांचं असं मत आहे त्यांनी लोकलमध्ये प्रवास करावा. प्रत्येक डब्यात किमान चार हातांमध्ये तुम्हाला पुस्तक दिसेलच. विद्यार्थी असतील तर इच्छित स्थळी पोहचेपर्यंच अनेक मुलींचे केमिस्ट्री, फिजिक्समधले दहा बारा फॉर्म्युले, डेफिनेशन तोंडपाठ होऊनच जातात.

एखाद्या सकाळी मनातल्या मनात रडणारी आई शेजारी बसलेली असते. पाळणाघरातल्या बाईला किंवा मग कदाचित घरच्याच एखाद्या व्यक्तीला बाळाच्या औषधाचे डोस सांगत असते. मध्येच तिचं मन हळवं होतं. बाळ आजारी पण तरीही आपल्याला ऑफिसला जावं लागतंय याची खंतही असते. एखादी बाई ऑफिसमधल्या राजकारणाविषयी मैत्रिणीला सांगत असते. बरं, या दोघी एका ऑफिसात असतात का, तर नाही. दोघी ट्रेनमधल्या मैत्रिणी. मैत्रीचा हा प्रकार तुम्हाला फक्त मुंबईतच दिसेल. वर्षानुवर्ष लोकलने प्रवास करणाऱ्यांमध्ये सुरुवातीला एकमेकांकडे बघून हसायचं, मग बोलायचं, मग जागांची देवाणघेवाण आणि हळूहळू सुखदु:खांचीही देवाणघेवाण. लोकलमधली ही मैत्री पुढे अशी फुलत जाते.

थोड्या उशिरानं लोकल प्रवास करताना शांतता असते. गर्दी नसल्यानं बरं वाटतं. पण जे जेमतेम चार-पाच चेहरे असतात. ते मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. अशा वेळी लोकलचा प्रवास नकोसा वाटतो. कुठे गप्पाटप्पा नाही. कुठे फोनवर भांडण नाही. ग्रुपचं गॉसिपिंग नाही की कोणाचं मोबाईलवर बॉयफ्रेंडशी लडीवाळ बोलणं नाही. असा प्रवास लवकर संपावा असं वाटतं. दुपारची गर्दी थोडी वेगळी, थोडीशी आळसावलेली, थोडी निरुत्साही. या गर्दीत विशेषत: शाळेतून मुलांना घरी घेऊन जाणाऱ्या अनेक आया ( मुंबईत आईसाठी वापरला जाणारा अनेकवचन शब्द आया) असतात. एखादी आई मुलाशी मस्त गप्पा मारत असते. एखादी मुलाला मारत असते. एखादी मोबाईलमध्ये गुंग, औपचारिकता म्हणून मुलाला शाळेतून घरी घेऊन जायला आली आहे की काय असं वाटून जातं. कधी काही कॉलेज तरुणींचाही ग्रुप असतो. मग त्यांचं तोंडाचा चंबू करुन (पाऊट का काय म्हणतात ते) मान थोडी वाकडी करायची आणि सेल्फी काढायचे. ते पाहून खळखळून हसायचं.

कधी कधी यात एखादी सेल्फी क्वीन पण असते. थोडाफार मेकअप करुन लोकलमध्ये चढताच छान जागा हेरुन थोडी तिरकी बसते आणि लागलीच सेल्फी काढणं सुरु होतं. आजूबाजूच्या गर्दीशी तिला काही देणंघेणं नसतं. तिला फक्त तिचे सुंदर फोटो काढायचे असतात. ज्यात ती तिच्या नजरेतून आणि तिच्या प्रिय व्यक्तीच्या नजरेतून सुंदर दिसेल असे ते सेल्फी असतात. मध्येच एकदम जोरात हसण्याचा आवाज येतो. तंद्री भंग पावते. एखाद्या मुलींचं किंवा बायकांचं टोळकं डब्यात शिरतं आणि कोणत्यातरी जोकवरुन हशा पिकतो. कधी कधी वाटतं विचारावं, का गं एवढ्या हसताय, मला पण सांगा मी पण हसेन. मला हसायला जाम आवडतं. मला कुणी माझा छंद विचारला तर मला हसायला खूप आवडतं असं मी सांगेन गर्दी कुठल्याही वेळची असो. यात एक तरी व्यक्ती अशी असतेच जी कोणत्यातरी विचारांनी त्रस्त झालेली दिसते. तिचं कुणीतरी जवळंच कोणत्यातरी आजाराने ग्रस्त. तिची घालमेल. पैशांची तजवीज सारे प्रश्न तिच्या चेहऱ्यावर दिसत असतात. याच गर्दीच अविभाज्य अंग फेरीवाले. रंगीबेरंगी वस्तू पाहिल्या की मन प्रसन्न होतं. त्यात माझी एक मैत्रीण आहेच ती कधी भेटली की मी तिच्याकडून काहीतरी विकत घेतेच.(तिच्याविषयी एकदा तिच्या छायाचित्रासह फेसबूक पोस्ट टाकली होती)

पण आजच्या गर्दीत मला एक चुणचुणीत मुलगा भेटला. कुर्ल्यातल्या पालिका शाळेत जातो. पण वस्तू विकायला वेस्टर्नला येतो. छान इंग्रजी बोलतो. चौथी की पाचवीत आहे. त्याच्याकडून माझ्या मुलासाठी फळा-फुलांची रंगवायची पुस्तकं घेतली. सहजच विचारलं. तुला नाही का कधी वाटत यातलं एखादं पुस्तक घ्यावं आणि आपणही रंगवावं? माझ्या या छोट्या प्रश्नानं मला खूप मोठं उत्तर मिळालं. हा मुलगा मला जगाचं ज्ञान देऊन गेला. म्हणतो ट्रेन मे बोहोत लोग ये खरीदते है मेरेसे, और मेरेकोही देते है, मेरे पास बोहोत जमा हो गये थे, फिर मैने जिनको ये बुक्स पसंद है लेकीन मेरे से भी गरीब है उनको मै वे फ्री मे देता हू... हे ऐकून मी निरुत्तर झाले. असं वाटलं मी एका दानशूर राजापुढेच उभी आहे. सगळं असूनही माझी झोळी फाटकीच आहे.

ट्विटरवर फॉलो करु शकता https://twitter.com/Suvarnayb