महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाला. बी. ई. (ऑनर्स), एम.एस. (बीआयटीएस) पिलानी, राजस्थान आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (युएसए) मधून त्यांचं शिक्षण झालं आहे. त्यांचे वडील दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात पंडीत जवाहरलाल नेहरूंचे सहकारी होते तर आई प्रेमलाकाकी चव्हाण या माजी खासदार होत्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधून १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली. २ वेळा ते राज्यसभेचे सदस्य देखील होते. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत. काँग्रेसचे ते १९७३ पासून सदस्य आहेत. १९९१ मे १९९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समितीचे सदस्य होते. १९९१-९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समितीचे सदस्य होते १९९४-९६ दरम्यान ते वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समितीचे सदस्य होते. १९९५-९६ दरम्यान सार्वजनिक उपक्रम समितीचे ते सदस्य होते. १९९६-९७ दरम्यान ते ११ व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य होते.
एप्रिल २००२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. एप्रिल २००८ मध्ये त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली. त्यांना कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन (अतिरिक्त कार्यभार), राज्यमंत्रीपद देण्यात आलं. २००४-२००९ व मे २००९ ते नोव्हेंबर २०१० पर्यंत ते पंतप्रधान, कार्यालयाचे राज्यमंत्री होते. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे प्रभारी देखील होते. महाराष्ट्राचे ते २६ वे मुख्यमंत्री होते. ११ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २८ एप्रिल २०११ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता.