Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या जवान या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याच्या या चित्रपटाचा प्रीव्ह्यू प्रदर्शित झाला होता. त्याच्या या चित्रपटाचा प्रीव्ह्यू पाहून त्याच्या चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. या दरम्यानच, मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आमिरनं शाहरुख खान विषयी एक मजेदार खुलासा केला आहे.
आमिर खाननं एका मुलाखतीत खुलासा केला की शाहरुखनं त्याला एक लॅपटॉप भेट केला होता. पण टेक्नॉलॉजीमध्ये थोडं मागे असल्यानं आमिरनं हा लॅपटॉप तब्बल पाच वर्षे वापरलाच नाही. जेव्हा त्यानं तो लॅपटॉप वापरण्यास काढला तेव्हा तो बंद पडला होता. आमिरच्या मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आमिरनं यावेळी सांगितलं की 1996 मध्ये शाहरुखनं त्याला एक कॉम्प्युटर खरेदी करण्यास सांगितले. आमिरनं घेतला नाही हे पाहून अखेर शाहरुखने स्वतः तो लॅपटॉप आमिरसाठी विकत घेतला अन् त्याला भेट म्हणून दिला.
याविषयी सांगताना आमिर म्हणाला, “तंत्रज्ञान आणि माझा दूरदूरवर संबंध नाही. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. 1996 दरम्यान मी आणि शाहरुख एका शो निमित्त परदेशात होतो. त्यावेळी ‘तोशिबा’ कंपनीचा एक नवा लॅपटॉप बाजारात आला होता. शाहरुख त्यावेळीही यासाठी प्रचंड उत्सुक होता. तो तेव्हाही टेक्नॉलॉजीला घेऊन उत्साही असायचा आणि अप टू डेट असायचा तर आजही तो तसाच आहे. त्यानं मला सांगितलं की मला वाटतं की तू पण हा कॉम्प्युटर घ्यायला हवा. मी माझ्या आयुष्यात कधी कॉम्प्युटर वापरला नव्हता. तर मी म्हणालो मला कॉम्प्युटर वापरता येत नाही आयुष्यात मी कधी वापरला नाही. तर मग मला कॉम्प्युटरची काय गरज? तर तो म्हणाला की नाही, तुला कळत नाही आहे, यात तू ऑफिसच्या गोष्टी ठेव, हे ठेव ते ठेव. मला खूप समजवलं. तर मी म्हटलं की तू जो खरेदी करशील तोच मला पण घे."
हेही वाचा : तू हिरोइनची भूमिका साकारू शकत नाही; अभिनेत्रीनं काम मागताच Akshay Kumar नं केली कमेंट
पुढे आमिर म्हणाला, “5 वर्षांनी जेव्हा माझ्या एका नव्या मॅनेजरनं मला सांगितलं की मी तुमच्या बाजूला असलेल्या लॅपटॉप पाहतो, तो मी वापरू का? तर मी त्याला म्हटलं की प्लीज वापरं. त्यानं तो वापरायला घेतला तर तो सुरुच झाला नाही. तब्बल 5 वर्षं मी त्या लॅपटॉपला हातही लावला नव्हता." आमिर आणि शाहरुख हे चांगले मित्र असून या दोघांनी एकत्र काम केलेलं नाही. या दोघांनी ‘पेहला नशा’ या चित्रपटात हे दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते.