कंगना रानौतकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, म्हणाली...

अभिनेत्री कंगना रानौत मुंबईत पोहोचली. यावेळी कडेकोट बंदोबस्त होता. मात्र, ती आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केलाय.  

Updated: Sep 9, 2020, 05:12 PM IST
कंगना रानौतकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, म्हणाली...  title=

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत मुंबईत पोहोचली. यावेळी कडेकोट बंदोबस्त होता. मात्र, ती आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केलाय. यात तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. व्हिडिओ शेअर करत मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. 

तुमने जो किया अच्छा किया. उद्धव ठाकरे आज माझं घर तोडले आहे, उद्या तुमचे गर्वहरण होईल, असे कंगनाने म्हटले आहे. यावेळी कंगनाने पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत असे म्हटले होते. त्यावेळी कोणाच्या बापात हिम्मत आहे, मला कोण आडवते, अशी तिने म्हणत आपण ९ तारखेला मुंबईत येत असून कोणच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हान दिले होते. यानंतर बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली.

कंगनाने व्हिडिओ शेअर करत म्हटले, 'उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते. फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटले आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. काश्मिरी पंडितांना कसं वाटते, हे मला आज समजले. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासियांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगलं आहे, कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र'.

दरम्यान, कंगना रानौत मुंबई विमानतळावर येत असल्याने भारतीय कामगार सेनेने मुंबई विमानतळावर आंदोलन केले. या आंदोलनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आंदोलन न करण्याची सूचना देवूनही आंदोलन केलं गेल्यानं, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी दर्शवल्याची सूत्रांची माहिती आहे.