प्रशांत अनासपुरे, झी २४ तास, मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली आणि कोकणात पुराने चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंब पुराच्या हाहाकारामुळे उद्धवस्त झाली आहेत. हजारो संसार अक्षरशः पाण्यात वाहून गेले. अशा कठीण प्रसंगी पुरग्रस्तांना मानसिक आणि आर्थिक मदतीची प्रचंड गरज आहे. अशा परिस्थितीत देशाच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात धावून येत आहेत. सामान्य जनतेकडून शक्य त्या मार्गाने पुरग्रस्तांची मदत करत आहे. तर दूसरीकडे नेहमी सामान्य जनतेचे आभार माननाऱ्या बॉलिवूडकरांनी त्यांच्या चाहत्यांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
त्यानंतर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन खुद्द पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. झी २४च्या बातमीनुसार अमिताभ बच्चन पुरग्रस्तांची मदत करणार आहेत. त्यांनी पुरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत सुद्धा केली.
याआधी, अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलियाने देखील पुरग्रस्तांना २५ लाखांची मदत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे त्या दोघांनी २५ लाखांचा चेक सोपावला आहे. ज्या महाराष्ट्रात या कलाकारांना डोक्यावर घेतले जाते, भरभरून जीवापाड प्रेम केले जाते त्यांची मानसिकता अशी कशी असू शकते असा प्रश्न उपस्थित झाला तर आश्चर्य वाटू नये.