मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या गोरेगाव येथील रेड चिली कंपनीवर मुंबई महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. शाहरुकने आपल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी बेकायदेशीरपणे उपहारगृह सुरु केले होते. यावर पालिकेने हातोडा चालवत बांधकाम जमिनदोस्त केले.
डीएलएच पार्क बिल्डींगमध्ये रेड चिलीजचे कार्यालय आहे. रेड चिलीजने ओपन टेरेसचे रुपांतर उपहारगृहात केल्यामुळे महापालिकेनेही कारवाई केली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. सुमारे २००० चौरस फुटाच्या जागेवर हे उपहारगृह होते
टेरेसवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याची परवानगी नव्हती. त्याशिवाय अग्नी सुरक्षेसंबंधीचे नियम आणि एफएसआय नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन करुन उपहारगृह सुरु केले असल्याचा पालिकेचा दावा रेड चिलीने फेटाळला आहे. हे उपहारगृह नव्हते. याठिकाणी कार्यालयात काम करणारे कर्मचारी दुपारी जेवण करण्यासाठी बसत होते.