'हे कसं काय होऊ शकतं,'...अन् मनोज वाजपेयी बाथरुममध्ये जाऊन रडू लागला, हंसल मेहता ठरले होते कारण

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आता हंसल मेहता यांच्या होम प्रोडक्शन 'भैय्याजी'मध्ये झळकणार आहे.   

शिवराज यादव | Updated: May 12, 2024, 03:58 PM IST
'हे कसं काय होऊ शकतं,'...अन् मनोज वाजपेयी बाथरुममध्ये जाऊन रडू लागला, हंसल मेहता ठरले होते कारण title=

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आपल्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. आपली मतं जाहीरपणे मांडताना तो जास्त विचार करत नाही. आपल्या प्रायव्हेट आणि प्रोफेशनल लाईफबद्दल तो नेहमीच सांगत असतो. हे सांगताना तो आपल्या मित्र आणि सहकाऱ्यांसह झालेल्या भांडणांबद्दलही थेट सांगतो. सिद्धार्थ कनन्नला दिलेल्या मुलाखतीत मनोज वाजपेयीने हंसल मेहता यांच्यासह झालेला वाद आणि त्याचा परिणाम याबद्दल सांगितलं. 

संघर्षाच्या दिवसांमध्ये हंसल मेहता यांच्यासह झालेल्या वादाबद्दल मनोज वाजपेयीने खंत व्यक्त केली आहे. जेव्हा हंसल मेहता यांच्यावर शाई फेकण्यात आली होती तेव्हा आपल्याला नेमकं काय वाटलं होतं याबद्दलही त्याने सांगितलं. तो म्हणाला की, "आमच्यासाठी तो फार कठीण काळ होता. मी मेहतनतीने तयार केलेलं करिअर हातातून निसटत होतं. अनेक नकोशा व्यक्ती प्रोजेक्टमध्ये आल्या होत्या. यामधील काही माझ्यामुळे आणि काही हंसल मेहतामुळे आल्या होत्या. यानंतर गोष्टी सरळ राहिल्या नाहीत.तुम्हाला वाईट वाटतं. वादामुळे फरक पडतो अशा व्यक्तींपैकी मी आहे. हंसलला निषेधाचा सामना करावा लागला आणि लोकांनी तोंडावर शाई फेकली. त्यांना हे माहिती नाही की, मी त्यानंतर बाथरुममध्ये जाऊन रडलो. त्याच्यासारख्या व्यक्तीसह असं काय होऊ शकतं असा विचार मी केला. काहीही झालं तरी त्यांनी मला फार मदत केली आहे. त्यांच्या आईचं निधन झालं तेव्हा मला फार वाईट वाटलं होतं. मला त्यांनी जेवण दिलं होतं. जेव्हा कधी मी त्यांच्या घरी जायचो तेव्हा आई मी काही खाल्लं नसेन असा विचार करुन त्या समोर जेवण आणून ठेवायच्या".

तो पुढे म्हणाला, “तुम्ही भक्कम असलात तरी एका क्षणानंतर तुम्ही खचता.घडलेल्या प्रकारामुळे आम्ही एकमेकांवर ओरडणे संपवले. पण आज तुम्ही मला विचाराल तर मी ते मनात ठेवलेलं नाही.हंसल अनुराग (कश्यप), रामू (राम गोपाल वर्मा) किंवा मी असो, हा आमच्या प्रवासाचा भाग होता.आमच्यात अनेक वाद झाले.पण मला एकच अडचण होती की माझ्या भावना रागाच्या भरात होत्या.मी रागातून व्यक्त व्हायचो.त्यामुळे माझ्या मित्रांना जास्त त्रास व्हायचा.मी त्यांच्यासमोर रडलो असतो तर ते नाराज झाले नसते पण माझ्या भावना नेहमी रागाच्या रूपात बाहेर पडतात.म्हणून जेव्हा मी माझी निराशा बाहेर काढायचो तेव्हा समोरची व्यक्ती पूर्णपणे दूर व्हायची.”

मनोज आणि हंसल मेहता यांनी 'दिल पे मत ले यार'मध्ये एकत्र काम केलं आहे. या चित्रपटात तब्बू, आदित्य श्रीवास्तव, सौरभ शुक्ला आणि विजय राज होते. त्यांनी राजकुमार राव सह-अभिनेता असलेल्या सामाजिक बायोपिक-ड्रामा अलीगढमध्ये देखील एकत्र काम केले. मनोज वाजपेयी सध्या भैय्याजी चित्रपटात झळकणार आहे.