Photograph Trailer VIDEO : नवाज अनोळखी मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा....

असा आहे प्रेमाचा 'फोटोग्राफ'   

Updated: Feb 19, 2019, 01:56 PM IST
Photograph Trailer VIDEO : नवाज अनोळखी मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा....  title=

मुंबई : प्रेम ही एक अशी भावना आहे, जी अव्यक्त राहिली तरीही तिची नुसती अनुभूतीच पुरतं आयुष्य बदलते. याच सुरेख भावनेचं चित्रण करत चक्क अनोळखी व्यक्तींची प्रेमकहाणी कशी असू शकते याचं चित्रण 'फोटोग्राफ' या चित्रपटातून करण्यात आलं आहे. रितेश बत्रा दिग्दर्शित या चित्रपटातून नवाजुद्दीन सिद्दीकी आणि 'दंगल फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर खुलणारी प्रेमकथा आणि त्यामध्ये सूत्रधाराची भूमिका निभावणारा एक फोटोग्राफ असं एकंदर चित्रपटाचं कथानक असल्याचा अंदाज ट्रेलर पाहून येत आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर विशेषत: पर्यटकांचे फोटो काढणारे फोटोग्राफर अर्थात छायाचित्रकार, त्यांचं आयुष्य आणि त्यात फुलणारी एक आगळीवेगळी दुरावा असूनही प्रेमाची, अस्तित्वाची अनुभूती असल्याची झलक ट्रेलरमधून येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध चित्रपट महोत्सवांमध्ये फोटोग्राफ प्रदर्शित करण्यात आला होता. जेथे या चित्रपटाने सर्वांचीच दाद मिळवली. त्यामुळे आता बॉलिवूड चित्रपटांच्या स्पर्धेत नव्या धाटणीचा हा फोटोग्राफ चाहत्यांची मनं जिंकतो का, हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अॅमेझॉन स्टुडिओज सादर करत असणारा हा चित्रपट १५ मार्च २०१९ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दंगल' फेम सान्या मल्होत्रा हिसुद्धा यात एका वेगळ्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिकेत दिसत आहे. तर, नवाजुद्दीन हा त्याच्या अभिनयाची छाप यावेळीही पाडत आहे. त्यामुळे आता हा फोटोग्राफ किती लाईक्स मिळवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.