पत्नीच्या 'त्या' आरोपानंतर अखेर नवाजनं घेतला मोठा निर्णय

त्याचं हे नातं चर्चेचा विषयही ठरलं

Updated: Jun 28, 2020, 02:44 PM IST
पत्नीच्या 'त्या' आरोपानंतर अखेर नवाजनं घेतला मोठा निर्णय  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई :  अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी हा सध्या त्याच्या मुळ गावी रमला असला तरीही त्याच्या खासगी आयुष्यात मात्र बऱ्याच घडामोडी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. नवाजच्या वैवाहिक जीवनात काही दिवसांपूर्वीच वादळ आल्याची चर्चा होती. पत्नीच्या आरोपांमुळं त्याचं हे नातं चर्चेचा विषयही ठरलं. ज्यानंतर आता नवाजनं एक मोठा निर्णय घेतल्याचं कळत आहे.

मे महिन्यामध्येच नवाजच्या पत्नीकडून त्याला घटस्फोटासाठीची नोटीस पाठवण्यात आली होती. आता पत्नीकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसीवर नवाजनं उत्तर दिल्याचं कळत आहे. अधिकृत सुत्रांच्या माहितीनुसार नवाजनं त्याच्या पत्नीवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. 

अदनान शेख या नवाजच्या वकिलानी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना याबाबत काही महत्त्वाची माहिती दिली. '(नवाजची पत्नी) आलिया हिनं केलेले आरोप खोटे आहेत. यामागे फक्त आणि फक्त नावजुद्दीनला केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. पुराव्यांअभावी असे कुठलेही आरोप करणं योग्य नाही त्यामुळं आता आम्ही तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. तिच्यावर आम्ही अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.', असं ते म्हणाले. 

 

दरम्यान, नवाज आणि त्याची पत्नी यांचं जवळपास १० वर्षांचं वैवाहित नातं धोक्यात आल्यामुळे ही बाब अनेकांनाच धक्का देणारी ठरत आहे. मागील काही वर्षांपासून नवाज आणि त्याच्या भावामुळं आपल्या वैवाहिक नात्यात तणावाची परिस्थिती उदभवल्याचा सूर तिने आळवला होता. काही काळ आपल्या निर्णयाचा पुनर्विचार केल्यानंतर अखेर तिनं घटस्फोटासाठीचं पाऊल उचललं होतं.