मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने बॉलिवूड वर्तुळात बऱ्याच सेलिब्रिटींनी काही खास समारंभाचं आयोजन केलं होतं. या साऱ्यामध्ये बच्चन कुटुंबीयांकडून आयोजिक केल्या जाणाऱ्या पार्टीची सर्वांनाच प्रतिक्षा होती. बी- टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला आवर्जून हजेरी लावली. अतिशय उत्साही वातावरणात सुरु असणाऱ्या या पार्टीमध्ये मध्यरात्र उलटल्यानंतर तीन वाजण्याच्या सुमारास मात्र असा काही प्रकार घडला, ज्यामुळे भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.
मुख्य म्हणजे त्या प्रसंगी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. 'मिड डे'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बच्चन कुटुंबीयांनी जलसा या त्यांच्या निवासस्थानी आय़ोजित केलेल्या पार्टीत ऐश्वर्या राय बच्चनच्या मॅनेजर असणाऱ्या अर्चना सदानंद यांच्या लेहंग्याने पेट घेतला आणि या दुर्घटनेत त्या पंधरा टक्के भाजल्या. सध्याच्या घडीला नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चना सदानंद त्यावेळी त्यांच्या मुलीसोबत कोर्टयार्डमध्ये होत्या. तेव्हाच त्यांचा लेहंगा दिव्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याने पेट घेतला. यावेळी उपस्थितांनाही नेमकं काय करावं हेच कळेना. तेव्हाच शाहरुख खानने समसूचकता दाखवत त्याने अर्चनाकडे धाव घेतली आणि शेरवानीवरील जॅकेटच्या सहाय्याने त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग कशी विझवता येईल ही एकच बाब त्याने नजरेत ठेवली होती. यामध्ये त्यालाही किरकोळ दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे.
नानावटी रुग्णालयाशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार अर्चना सदानंद यांना तेथील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही, पण कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे. त्या या दुर्घटनेतून सावरत असल्याचंही म्हटलं जात आहे.
माध्यमांमध्ये या संपूर्ण प्रकरणाची फारशी वाच्यता नाही. शिवाय बच्चन किंवा खान कुटुंबीय किंवा खुद्द अर्चना सदानंद यांनीही माध्यमांना याविषयी कोणतीच माहिती दिलेली नाही. पोलिसांकडे नोंदवण्य़ात आलेल्या जबाबामध्ये सदानंद यांनी ती घटना एक दुर्घटना असल्याचं स्पष्ट केल्याचं कळत आहे.
सणोत्सवाच्या दरम्यानच झालेल्या या घटनेप्रसंगी शाहरुखमुळे मोठा अनर्थ टळला. सेलिब्रिटींची मांदियाळी असणाऱ्या या पार्टीत शाहरुखची समयसूचकता पाहता, त्याचं सेलिब्रिटीपण आणि चाहत्यांच्या मनात त्याच्याप्रती असणारा आदर खऱ्या अर्थाने वाढेल यात शंका नाही.