'या' चित्रपटात दीपिकाच साकारणार रणवीरची पत्नी

दीपिकासोबत पुन्हा काम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं. 

Updated: Jan 8, 2019, 11:57 AM IST
'या' चित्रपटात दीपिकाच साकारणार रणवीरची पत्नी

मुंबई : 'राम-लीला', 'बाजीराव-मस्तानी' आणि 'पद्मावत' या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये झळकलेले दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि रणवीरने लग्नगाठ बांधत खऱ्या आयुष्यातही एकमेकांना कायमची साथ देण्याची वचनं दिली. 

रुपेरी पडद्यापासून सुरू झालेला त्यांच्या प्रेमाचा प्रवास या वेगळ्या वळणावर आला खरा. पण, आता हीच जोडी पुन्हा कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हेच जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. याच उत्सुकतेच्या वातावरणात काही दिवसांपूर्वी नाराजीचं वातावरणही दिसू लागलं होतं. कारण, खुद्द रणवीरनेच यंदाच्या वर्षात तो आणि दीपिका एकत्र काम करु शकतील असा एकही चित्रपट आपल्याकडे नसल्याचं स्पष्ट केलं होतं. शिवाय निर्माते- दिग्दर्शकांनी आपल्याला अशा चांगल्या चित्रपटाचा प्रस्ताव द्यावा, कारण दीपिकासोबत पुन्हा काम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं. 

रणवीरची हीच हाक ऐकली गेल्याचं आता स्पष्ट होत आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकत साकारल्या जाणाऱ्या चित्रपटात दीपिकाची वर्णी लागू शकते. रणवीर या चित्रपटामध्ये कपिल देव यांची भूमिका साकारत असून, कपिल देव यांच्या म्हणजेच रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारण्याची संधी दीपिकाला मिळू शकण्याची चिन्हं आहेत. 

कबीर खान दिग्दर्शित चित्रपट '८३' मध्ये रोमी भाटीया, म्हणजेच कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी दीपिकाच्या नावाला पसंती देण्यात आली असून, लवकरच यासंबंधी चित्रपट निर्माते भेट घेणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात पती- पत्नी असणारी ही लोकप्रिय जोडी रुपेरी पडद्यावरचे पती पत्नी साकारत पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.