'संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, पण सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न'

 तिनं पुन्हा एकदा टीकेचा सूर आळवला.

Updated: Sep 21, 2020, 12:03 PM IST
'संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, पण सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न' title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आणि मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत kangana ranaut  हिनं पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला. भिवंडीतील दुर्घटना प्रकरणाचा संदर्भ देत सध्याच्या घडीला राज्य शासनाच्या भूमिकेवर तिनं सडकून टीका केली आहे. 'संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, पण महाविकासआघाडी सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न', अशा शब्दांत तिनं पुन्हा एकदा टीकेचा सूर आळवला.

एका ट्विटमधून भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत माहिती देत, 'सध्या दुर्दैव हे आहे की सध्या महाराष्ट्र शासनाकडे फक्त कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यापुरताच वेळ आहे', अशी प्रतिक्रिया देण्यात आली. या ट्विटचा संदर्भ घेत त्यावर उत्तर देण्यासाठी म्हणून बी- टाऊनची ही क्वीन पुन्हा मोठ्या आवेगात महाराष्ट्र शासनावर टीका करताना दिसली. 

'दरम्यानच्या काळात महाराष्ट्र सरकारचं क-क-क-क कंगनाच सुरु आहे. त्यांनी माझा नाद सोडला तर कुठं, साऱ्या राज्याचा डोलारा नेमका कसा कोलमडत आहे हे त्यांच्या लक्षात येईल', असं ट्विट तिनं केलं. 

 

भिवंडीमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुख्य म्हणजे अतिधोकादायक म्हणून या इमारतीला नोटीस जाऊनही त्यापुढील कारवाई मात्र करण्यात आली नव्हती. त्यामुळं पुन्हा एकदा स्थानिक आणि राज्य प्रशासनाकडून अशा प्रकारच्या बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हीच बाब हेरत आपल्याला होणाऱ्या विरोधाची किनार अधोरेखित करत कंगनानं सरकारवर थेट शब्दांत टीका केली.