Suniel Shetty Birthday Interesting Facts: अभिनेता सुनील शेट्टीचा आज 62 वा वाढदिवस आहे. एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा ते सध्या बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक असा प्रवास सुनील शेट्टीने पाहिला आहे. सुनील शेट्टीने त्याच्या अभिनयाच्या जोरावर नाव, पैसे आणि लोकप्रियता मिळवली. सुनील शेट्टीच्या यशाचा यावरुन अंदाज बांधता येतो की त्याने त्याचे वडील जिथं सफाई कामगार म्हणून काम करायचे त्या सर्व बिल्डींगही विकत घेतल्या. एका फोटोशूटच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्राकडे वळलेल्या सुनील शेट्टीला मनोरंजन क्षेत्र सोडण्याचा सल्लाही देण्यात आला होता. मात्र सुनील शेट्टी संघर्ष करत राहिला आणि 90 च्या दशकामध्ये तो सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी...
11 ऑगस्ट 1961 साली सुनील शेट्टीचा जन्म मंगळुरुमधील (आता कर्नाटक) मुल्की शहरामध्ये झाला. मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या सुनीलचे वडील वीरप्पा शेट्टी यांच्या हाताला काही काम नव्हतं. त्यामुळेच ते लाखो लोकांप्रमाणे काही स्वप्न उराशी बाळगून मुंबईला आले. या ठिकाणी त्यांना सुरुवातीला काही काम मिळत नव्हतं म्हणून त्यांनी सफाई कर्मचाऱ्याची नोकरी स्वीकारली. ज्या इमारतीमध्ये वीरप्पा साफसफाईचं काम करायचे ती जुहूमध्ये होती. जुहूमध्येच वीरप्पा यांनी आपल्या कुटुंबाच्या निवाऱ्याची सोय केली.
शेट्टी यांच्या जुहूमधील घरापासून काही अंतरावर पाम बीच स्कूल नावाची शाळा होती. याच ठिकाणी सुनील शेट्टीला शाळेत घालण्यात आलं. सुनील शेट्टी बालपणी फार मस्तीखोर होता. अनेकदा त्याच्या तक्रारी घरापर्यंत यायच्या. मात्र आपल्या मस्तीखोरपणाबरोबरच सुनील शेट्टी त्याच्या क्रिकेटसाठी शाळेत प्रसिद्ध होता. त्याने शाळेकडून क्रिकेट खेळताना अनेकदा शाळेला रोमहर्षक विजय मिळवून दिले. सुनील शेट्टी मोठा झाल्यानंतर नक्कीच क्रिकेटपटू होईल असं अनेकांना त्यावेळी वाटायचं. सुनील शेट्टीचंही क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न होतं.
सुनील शेट्टीने तारुण्यात पदार्पण करेपर्यंत घराची परिस्थिती स्थिरावली होती. वडिलांनी सफाई कर्मचाऱ्याची नोकरी सोडून एक दाक्षिणात्य उडपी हॉटेल सुरु केलं. या हॉटेलमध्ये मुंबईत स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेले अनेजण चविष्ट पण तितकेच्या स्वस्त आणि दर्जेदार पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी यायचे. रिकामा वेळ असायचा तेव्हा सुनील शेट्टी स्वत: या हॉटेलमध्ये जाऊन वडिलांना कामात हातभार लावायचा.
काही काळानंतर सुनीलच्या वडिलांना हॉटेल व्यवसायामध्ये चांगलं यश मिळालं. यामधून मिळालेल्या पैशांमधून त्यांनी एक कपड्यांचं दुकान सुरु केलं. शालेय जीवनामध्ये जॅकी श्रॉफ हा सुनील शेट्टीच्या पुढच्या वर्गात होता. मात्र शाळेतून बाहेर पडल्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. चाळीत राहणारा जॅकी श्रॉफ मॉडलिंगच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी संघर्ष करत होता तेव्हा सुनील शेट्टी त्याच्या वडिलांच्या दुकानामधून जॅकीला नवीन नवीन कपडे द्यायचा. जॅकी ते कपडे घालूनच क्लायंट्सला भेटायला जायचा. परत आल्यानंतर तो ते कपडे सुनीलला परत करायचा. सुनीलने केलेल्या या मदतीच्या मोबदल्यात जॅकी श्रॉफ टकाटक तयार होऊन सुनील शेट्टीच्या वडिलांच्या दुकानासमोर फेऱ्या मारायचा. त्याला पाहून अनेकजण या दुकानामध्ये त्या काळातील स्टायलिस्ट कपडे खरेदी करण्यासाठी यायचे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुनील शेट्टीने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली. मात्र एका मित्राच्या माध्यमातून 30 च्या उंबरठ्यावर असताना सुनील शेट्टी मनोरंजन सृष्टीमध्ये आला. वयाच्या 31 व्या वर्षी सुनील शेट्टीचा 'बलवान' चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. सुनील शेट्टीवर डायलॉग डिलेव्हरीवरुन चांगलीच टीका झाली. काहींनी तर हिरो बनण्याचं स्वप्न सोड आणि वडिलांचं हॉटेल चालव असा खोचक सल्लाही सुनीलला दिला. हे ऐकून सुनीलला फार वाईट वाटलं. मात्र त्याने जिद्द सोडली नाही. हिरो म्हणून तुझ्या आवाजात दम नाही असं ऐकल्यानंतर सुनील शेट्टी पहाटे 4 वाजता उठून चित्रपटांची डबिंग करायचा. आवाज भारदस्त वाटावा म्हणून सुनील प्रयत्न करायचा. यानंतर सुनीलने 'वक्त हमारा है' (1993), 'पहचान' (1993), 'दिलवाले' (1994), 'मोहरा' (1994), 'गोपी किशन' (1994), 'कृष्णा' (1996) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तो 90 च्या दशकामधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक झाला.
'हेरा फेरी', 'धडकन', 'ये तेरा घर ये मेरा घर', 'फिर हेरा फेरी' यासारख्या चित्रपटांमधील सुनीलची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेली. अनेक चित्रपटांमध्ये अॅक्शन हिरो म्हणून काम करणाऱ्या सुनील शेट्टीला 2001 साली पहिला पुरस्कार मिळाला. मात्र हा पुरस्कार त्याला 'धडकन'मधील नकारात्मक भूमिकेसाठी मिळाला होता. सुनील शेट्टी आज एक उद्योजक म्हणूनही ओळखला जातो.