close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मांत्रिकाच्या रुपातील बॉलिवूड अभिनेता पाहून काही आठवलं का?

पुन्हा तोच थरार.... -

Updated: Aug 19, 2019, 08:05 AM IST
मांत्रिकाच्या रुपातील बॉलिवूड अभिनेता पाहून काही आठवलं का?
छाया सौजन्य- ट्विटर / @KartikAaryanHQ

मुंबई : अवघ्या दोन ते तीन तासांचा चित्रपटही प्रेक्षकांच्या मनावर कायस्वरुपी छाप पाडून जातो, हे सिद्ध करणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'भूल भुलैया'. २००७ मध्ये एका गूढ कथेला विनोदी किनार देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्यामध्ये अभिनेता अक्षय कुमार याच्या अफलातून अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. 

आता तब्बल १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा 'भूल भुलैया' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, अर्थातच यावेळी काहीशा वेगळ्या अंदाजात. खिलाडी कुमारऐवजी यावेळी या 'भूल भुलैया २'मध्ये अभिनेता कार्तिक आर्यनची वर्णी लागली आहे. ज्यावर शिक्कामोर्तब करणारी त्याची पहिली झलकही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

'१३ साल बाद...' असं लिहिण्यात आलेल्या या पोस्टवर कार्तिकचं एकंदर रुप पाहता प्रथमदर्शनी खिलाडी कुमारच डोळ्यांसमोर येतो. पण, हा अक्षय कुमार नसून कार्तिक आहे, हेच खरं. एका मांत्रिकाच्या रुपात, गळ्यात रुद्राक्षांची माळ असणारा, मानवी सांगाड्यांमद्ये बसलेला आणि चेहऱ्यावर वेगळेच भाव असणारा कार्तिक पाहता, चित्रपटाकडून प्रेक्षकही आतापासूनच काही अपेक्षा ठेवू लागले आहेत. 

अनिस बाजमी दिग्दर्शित या चित्रपटासाठी आणखी कोणकोणत्या कलाकारांना प्राधान्य देण्यात आलं आहे, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. तूर्तास, कार्तिकचा हा लूक पाहता आणि चित्रपटाच्या पोस्टरचा अंदाज पाहता कोणत्या गूढ कहाणीची उकल होणार याविषयीच चित्रपट रसिकांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी, म्हणजेच ३१ जुलै २०२० मध्ये या 'भूल भुलैया २'चा थरार बॉक्स ऑफिसर धडकणार आहे.