कुशलच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री चिन्मयी सुमीतनं व्यक्त केली मनातली खदखद

'सुरुवात कुशलबद्दल लिहून केली आहे पण मला माझ्या मनातलं काही सांगायचं आहे...'

Updated: Dec 27, 2019, 11:41 PM IST
कुशलच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री चिन्मयी सुमीतनं व्यक्त केली मनातली खदखद

मुंबई : बॉलिवूड, टीव्ही आणि वेब सीरीजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा तरुण अभिनेता कुशल पंजाबी (३७ वर्ष) यानं गुरुवारी आत्महत्या केली. मानसिक त्रासातून त्यानं आत्महत्या केल्याची बाब पुढं आलीय. वांद्र्यातील राहत्या घरीच गळफास घेऊन त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेली सुसाइड नोटदेखील पोलिसांना सापडलीय. कुशलच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करण्यात येतंय. अभिनेत्री चिन्मयी सुमीत हीनंही कुशलच्या मृत्युबद्दल दु:ख व्यक्त करतानाच बऱ्याच दिवसांपासून मनात असलेली खदखद सोशल मीडियाद्वारे मोकळी केलीय.

चिन्मयी सुमीतनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय...

''कुशल पंजाबीच्या आत्महत्येच्या बातमीने खूप उदास वाटतं आहे... किती आणि कुठले कुठले ताण-तणाव सहन करत असतात ही कलाकार मंडळी. स्पेशली टिव्ही आणि सिनेमातली. सततची अनिश्चितता, कामाच्या वेळेची अनियमितता, करमणूक, मनोरंजनासाठी वेळ नाही. कौटुंबिक स्वास्थ्याची पुरती लागलेली वाट... कितीतरी गोष्टी.. त्यात सतत लोकांची नजर तुमच्यावर, चांगलं दिसत रहाण्याचं प्रेशर...

सुरुवात कुशलबद्दल लिहून केली आहे पण मला माझ्या मनातलं काही सांगायचं आहे, मी इथे बऱ्याचदा लिहिते. माझी विचारधारा, माझा स्वभाव अगदीच अपरिचित नसावा इथे जर असेल तर हे वाचून थोडा समजेलही...

सुमीत हा माझा नवरा. अत्यंत गुणी नट आणि तितकाच लाखमोलाचा माणूस. तो देखणा आहे, चांगला गातो, फिटनेसबद्दल कमालीचा जागरुक आहे. समाजभान असलेला, संवेदनशील माणूस आहे तो. तितकाच चांगला मित्रही. मी त्यांची बायको. त्याचं सगळ्यांकडून होणारं कौतुक मला खूप सुखावतो. मला खूप अभिमान आहे त्याच्याबद्दल. तो माझा आहे म्हणजे माझी त्याच्यावर मालकी आहे असं मुळीच कधीच माझ्या मनात आलं नाही. मी कधीही त्याची बरोबरी करण्याचा प्रयत्न न करता साथ केली आहे. पण तरीही सतत, मी कशी त्याला शोभून दिसत नाही, मी कशी काळी, मी कशी जाड ह्याबद्दलच्या कमेन्ट्सचा मला सतत सामना करावा लागला आहे. तुम्ही आम्हाला आवडता पण सुमीत जास्त आवडतो हेही सांगून झालेलं आहे. ' I have hots for your husband' ' he was my first crush' हे खूप हसत हसत स्वतःचे नवरे आसपास नसतांना (त्यांची मनं दुखावली जाऊ शकतात, माझ्याबाबतीत मी खूप कुल असल्याने तो संभव नसतो) मला सांगितलं गेलं आहे. मी सतत सावलीसारखी कधीच नसते सुमीतबरोबर. काही पार्ट्या तर टाळते तर 'अरे, आया करो तुम, नहीं तो लोगोंको लगता है तुम्हारे बीच कुछ ठिक नहीं चल रहा', मी ह्या गोष्टींना कधी भीक घातली नाही. पण ही भीक न घालणं, फरक पडू न देणं, आत्मविश्वास शाबूत राखणं ह्यात खूप उर्जा कामी लागते. कितीही नाही म्हटलं तरी जरा छातीत कसनुसं होतंच.

Image may contain: 4 people, people smiling
फोटो सौजन्य. फेसबुक (सुमीत राघवन)

माझा रंग माझ्या हातात नाही. माझ्या जाडपणाची काही कारणं असू शकतील का? असतील का मला काही आजार हा विचारही नसेल का शिवत मनाला? आणि माझ्याबद्दल काहीच माहित नसेल तर मी इतकी कणखर किंवा ' कुल' आहे की ह्या प्रतिक्रियांनी मला काहीच फरक पडणार नाही असं कसं काय ठरवता येत असेल?

आतापेक्षा जरा लहान होते तेव्हा अघोरी उपाय करुन बारीक व्हायचा प्रयत्नही केला होता. तब्येत अजून खराब करुन घेतली. आपण चांगले दिसत नाही म्हणजे आपण वाईटच आहोत अशीही समजूत करुन घेतली होती काही काळ. मी फार लढलेय, झुंजलेय ह्या गोष्टींशी. आता निवांत झालेय, माझी उर्जा मी फक्त आणि प्रेम करण्यात उपयोगी आणते. खूपजण आहेत ज्यांना एका कानाची गरज असतं , आपण सांगितलेलं ऐकून घेण्याची, समजून घेण्याची ,माझ्याकडे तो वेळ आहे, ती समजूत आहे. बरंच काम असं आहे की जिथे माझ्या ' दिसण्याची' नाही ' असण्याची' गरज आहे, ते काम मी मनोभावे करते.

माझी ही पोस्ट वाचून खूपजण 'पण तू तर किती छान दिसतेस ' वगैरे लिहितीलही कनवाळूपणे.. त्यांना आधीच धन्यवाद. मला हल्ली खरंच काही गंभीरपणे घ्यावं असं वाटतं नाही.

कुशलची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी चुकीची झाली होती म्हणे.. त्यानेही भर पडली असेल त्याच्या डिप्रेशनमध्ये कदाचित. इथे खूप मित्र मैत्रिणी आहेत... तुम्हीही कशाशी झुंजत असाल, कधीही वाटलं हक्काने बोलावं तर मी आसपासच आहे.

प्रिय कुशल, सदतीस हे वय नव्हतं मित्रा हार मानायचं. जिथे पोहोचला असशील ते ठिकाण तणावरहित असो. असीम शांततेचं असो''

चिन्मयी गेल्या अनेक वर्षांपासून सिने इंडस्ट्रीत काम करतेय. सध्या ती छोट्या आणि मोठ्या पडद्यावरूनही प्रेक्षकांसमोर येताना दिसते. बनगरवाडी, निलांबरी, हृदयनाथ, चेकमेट आणि मुरांबा अशा काही सिनेमांत चिन्मयीनं काम केलंय. तसंच तिची अनेक नाटकांतही काम केलंय. 'ज्वालामुखी' या नाटकादरम्यान चिन्मयी आणि सुमीत राघवन या दोघांची भेट झाली होती. या जोडप्याला नीरद आणि दीया अशी दोन मुलंही आहेत.