बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलचं गाणं 'तौबा तौबा' (Tauba Tauba) सध्या सोशल मीडियावर (Social Media) ट्रेंड होत आहे. बॅड न्यूज चित्रपटातील या गाण्यावर तरुणाई थिरकत असून रील करत आहे. गाण्यात विक्की कौशलने आपला स्वॅग दाखवला असून, तो चाहत्यांना आवडत आहे. बॉस्कोने (Bosco) हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे. 'इंडिया टुडे'शी बोलताना त्याने या गाण्यासाठी घेतलेली मेहनत, यशावर भाष्य केलं असून, अद्यापही कोरिओग्राफर्स बॉलिवूडमध्ये न्याय मिळवण्यासाठी लढा देत आहेत अशी खंत व्यक्त केली.
बॉस्कोने गाण्याला प्रसिद्धी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पण हा ट्रेंड, प्रसिद्धी मिळत असताना कोरिओग्राफर्स दुर्लक्ष होत असल्याची नाराजीही त्याने बोलून दाखवली आहे. तौबा तौबा गाणं व्हायरल होण्यामागे कोरिआग्राफर्सचीही तितकीच मेहनत असताना, त्यांची योग्य ती दखल घेतली जात नाही असं बॉस्कोने म्हटलं आहे.
"इंटरनेटवर सगळीकडेच विक्की ज्याप्रकारे डान्स करत आहे त्याचीच चर्चा सुरु आहे. विक्कीचा डान्स शक्य झाला कारण त्यामागे एक व्यक्ती होती. कोणत्याही चुकीच्या प्रकारे समजू नका. गाण्याच्या यशाचा मलाही आनंद आहे. पण कुठेतरी मलाही निर्लज्जपणे हे सांगायचं आहे की, या गाण्यात तो ट्रेंड आणल्याबद्दल फक्त मीच नाही तर कोरिआग्राफर्सचंही सेलिब्रेशन करायला हवं, जर मी ती वाईब आणि स्टाईल दिली नसती तर मला वाटत नाही की इतकी चर्चा झाली असती. ज्याप्रकारे माधुरी आणि सरोज खान यांनी सेलिब्रेट केलं त्याप्रकारे कोरिओग्राफर्सचीही दखल घेण्याची वेळ आली आहे," असं बॉस्को म्हणाला.
बॉस्कोने त्याचा डान्सिंग पार्टनर सीझर गोन्सालविस याच्यासमवेत ३० वर्षांच्या कारकिर्दीत 500 हून अधिक बॉलीवूड गाण्यांची कोरिओग्राफी डिझाईन केली आहे. तो म्हणाला की तो गाणं फक्त कोरिओग्राफ करत नाही तर ते समजून घेण्यासाठी आणि त्यासाठी एक परिपूर्ण मूड तयार करण्यासाठी प्रयत्न करतो. विकीचा संदर्भ संदर्भ देत, तो म्हणाला, "विकीने 'गोविंदा नाम मेरा' सारख्या इतर अनेक गाण्यांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मग यावेळी काय बदलले? या गाण्यात त्याची इतकी स्तुती का केली जात आहे? याचं कारण ते कसे दिग्दर्शित केले आहे. अभिनेत्याला ग्लोरिफाय करण्याच्या दृष्टीनेही खूप विचार केला गेला आहे. चांगल्या प्रतिक्रिया मिळवण्यासाठी सर्वोत्तम करणं आमचं कर्तव्य आहे".
गाण्याला मिळालेल्या यशाचा आनंद झाल्याची कबुली देताना त्याने कोरिओग्राफर्सना आणखी यश मिळावं यासाठी शुभेच्छा दिल्या. "मला एकमताने वाटते की, संपूर्ण गाणं साजरं केलं जात आहे आणि आत्तापर्यंत कोणतीही विचित्र प्रतिक्रिया दिसत नाही. मला आशा आहे की कोरिओग्राफरलादेखील अभिनेत्याप्रमाणेच त्याचं यश मिळावं," असं तो म्हणाला आहे.
"विकी खूप सहकार्य करणारा अभिनतेा आहे. तो सरेंडर करतो आणि तुमचं म्हणणं ऐकतो. तो मातीसारखा आहे, जो तुम्ही तयार करू शकता. त्याला एक उपजत व्यक्तिमत्त्व आहे जे खरोखरच मस्त आहे, आणि अतिशय मर्दानी आहे. त्याच्याकडे एक ऑरा असून, त्याला डान्स करणं शोभतं. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोणालाही प्रभावित करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार नाहीत," असं त्याने स्पष्ट केलं.
बॉस्कोला 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधील 'सेनोरिटा' या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. इंडस्ट्रीने कोरिओग्राफर्सला अधिक चांगली वागणूक द्यावी अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. 'दिल धडकने दो' मधील 'गल्लन गुडियां' ची कोरिओग्राफी आपण केली असून हे गाणे व्हायरल झाले. पण मीच या गाण्यामागे आहे हे कोणाला माहिती नाही अशी खंत त्याने मांडली आहे.