1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पेहला नशा' चित्रपटात पहिल्यांदाच शाहरुख खान, आमीर खान आणि सैफ अली खान एकत्रित दिसले होते. तिन्ही खान यांनी या चित्रपटात कॅमिओ केला होता. आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. दीपक तिजोरी, पूजा भट्ट आणि रवीना टंडन या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. नुकतंच दीपक तिजोरीने सैफ अली खानने या चित्रपटात कॅमिओ करावा अशी त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची इच्छा नव्हती असा खुलासा केला आहे. झूमला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला.
"1993 मध्ये आम्ही पेहला नशा चित्रपट करत होतो. चित्रपटात मी अभिनेता दाखवण्यात आलो होतो. माझ्या चित्रपटाच्या प्रीमिअरला सर्व मोठे सेलिब्रिटी येतात असा सीन शूट करायचा होता. आशुतोष गोवारीकर चित्रपटाचा दिग्दर्शक होता. त्याचे इंडस्ट्रीत बरेच मित्र होते. एका क्षणी असं काही घडलं जे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. शाहरुख, आमीर, सैफ असे सगळेजण येणार होते," असं दीपक तिजोरीने सांगितलं.
पुढे त्याने सांगितलं की, "सैफ त्याच्या सीनसाठी तयार होत होता. तो घरात तयार होत असताना, त्याची पत्नी अमृता सिंगने तू काय करत आहेस, कुठे चालला आहेस? अशी विचारणा केली. त्यावर त्याने मी प्रीमिअरला, शूटसाठी जात असल्याचं सांगितलं. दीपकच्या चित्रपटात प्रीमिअरचा सीन असून माझ्या त्यात सीन आहे असं तो म्हणाला. त्यावर ती म्हणाली खरंच? तू हे कसं काय करु शकतोस? आपण अशा गोष्टी कधीच करत नाही. तुला माहितीये का अशा गोष्टी कोण करतं? प्रीमिअरला जाऊन एखाद्याला पाठिंबा देणं. माझ्यासाठी हा धक्का होता".
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचं 1991 मध्ये लग्न झालं होतं. 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सैफ आणि अमृता वेगळे झाले असले तरी मुलं सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांचा एकत्रित सांभाळ करतात.
दरम्यान, दीपक तिजोरीने Tipppsy चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून लवकरच तो प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने दीपक तिजोरीला त्याची एकेकाळची सह-अभिनेत्री पूजा भट्टने शुभेच्छा दिल्या आहेत. पूजाने म्हटलं आहे की, “30 हून अधिक वर्षांचं हास्य, अश्रू, आनंद आणि काही परीक्षेचा काळ...या सर्व काळात तू स्थिर राहिलास. एक मित्र ज्याला मी कोणत्याही संकटात पहाटे 4 वाजता फोन करु शकते. तुमचा Tipppsy चा ट्रेलर काही तासात रिलीज होत असल्याने आजचा दिवस मोठा आहे. मला तुमचा अभिमान आहे. म्हणूनच मी तुम्हाला आणि तुमच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी तिथे येणार आहे. जीवन म्हणजे सिनेमा आणि सिनेमा म्हणजे जीवन".