मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'छपाक' १० जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. लोकांमध्ये 'छपाक'बाबत उत्साह आणि नाराजी दोन्ही असल्याचं चित्र आहे. अशातच दीपिका शुक्रवारी सकाळी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी, आशिर्वाद घेण्यासाठी पोहचली. दीपिका तिच्या खास प्रसंगी अनेकदा सिद्धीविनायक मंदिरात येताना पाहायला मिळते.
दीपिकाच्या लग्नानंतर तिचा हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शिवाय, १० जानेवारीला दिपिकाच्या 'छपाक'सोबतच, अजय देवगण, सैफ अली खान, काजोल स्टारर 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.
Deepika Padukone offers prayers at Shree Siddhivinayak Temple in Mumbai. Her film #Chhaapak is releasing today pic.twitter.com/YNFxt6Mscx
— ANI (@ANI) January 10, 2020
दीपिकाच्या 'छपाक' चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत होता. मात्र 'छपाक' प्रदर्शनाच्या आधी दीपिका दिल्लीतील जेएनयूत दाखल झाल्यानंतर 'छपाक' अधिक चर्चेत आला. जेएनयूमध्ये दीपिकाने मौन समर्थन दिलं असलं तरी सोशल मीडियावर याबाबत चांगलीच चर्चा झाली. जेएनयूत जाण्याच्या निर्णयाबाबत काहींनी दीपिकाला शूर, तर काहींनी तिचं जेएनयूत जाणं एक पब्लिसिटी स्टंट किंवा प्रमोशनल फंडा असल्याचं म्हटलं होतं. दीपिकाच्या जेएनयू भेटीनंतर सोशल मीडियावर #boycottchhapaak आणि #BlockDeepika हे हॅशटॅग सुरु होते.
मात्र, आता 'छपाक' प्रदर्शित झाला आहे. 'छपाक'सोबतच 'तानाजी : द अनसंग वॉरियर'ही प्रदर्शित झाल्याने, या दोन चित्रपटांपैकी बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.