मुंबई : जान्हवी-ईशानचा धडक सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत होता. पण प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी कमाईची गती मंदावली आहे. सैराट या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक असलेला धडक बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल, असे म्हटले जात होते. सैराटपेक्षा अधिक कमाई करेल, असे बोलले जात होते.
पण आता सिनेमाचे बजेटही वसूल होणे, मुश्किल झाले आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केल्यावर वीकेंडला ही सिनेमाने चांगली कमाई केली. पण त्यानंतर सिनेमाच्या कमाईला ब्रेक लागला.
रिपोर्ट्सनुसार, धडकच्या सहाव्या दिवसाची कमाई सुमारे ४७.३५ कोटी इतकी होती. धडक सिनेमाचे बजेट ५० कोटी होते. आता कमाईसाठी एकच दिवस बाकी असताना सिनेमाचे बजेट तरी वसुल होईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण २७ जुलैला संजय दत्तचा 'साहेब बीवी और गॅंगस्टर' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याचा आधीच मंदावलेल्या धडकच्या कमाईवर नक्कीच परिणाम होईल.
धडक आणि सैराटची तुलना केली तर धडकची जादू काहीशी फिकी पडली. सैराटचे बजेट ४ कोटी होते आणि सिनेमाने १०० कोटींची कमाई केली होती. तर ५० कोटी बजेट असलेला धडक बजेट इतकीही कमाई करु शकला नाही.