मुंबई: आपल्याकडे लग्न केल्यानंतर स्त्रियांना स्वतंत्र अशी ओळख उरत नाही. एखाद्याची पत्नी याच ओळखीने त्यांना आयुष्यभर मिरवावे लागते. भारतीय लग्नसंस्थेचा हा दोष आहे, असे मत अभिनेत्री कल्की कोचलीन हिने व्यक्त केले. शालिनी चोप्रा आणि मेघना पंत यांनी लिहलेल्या 'फेमिनिस्ट रानी' पुस्तकातील मुलाखतीत कल्कीने लग्नसंस्थेविषयी आपले विचार मांडले. तिने म्हटले आहे की, आपल्याकडे समाजाने लग्नसंस्थेची रचनाच अशी केली आहे की, स्त्रीला कायम दुर्बल समजले जाते. स्त्रीवरील मालकी हक्क हा लग्नसंस्थेतील सर्वात मोठा दोष असल्याचे कल्कीने सांगितले.
यासाठी कल्कीने स्वत:च्या आयुष्याचे उदाहरण दिले आहे. माझे लग्न झाल्यानंतर केवळ अनुरागला आमंत्रण असलेल्या कार्यक्रमांमध्येच मला बोलावले जाई. लोकांच्या तोंडात 'अनुरागच्या पत्नीला बोलवा', अशी भाषा असायची. कोणीही 'कल्कीला' बोलवा किंवा 'कल्कीच्या नवऱ्याला बोलवा', असे बोलत नसे. त्यामुळे लग्नसंस्थेत स्त्री कायम दुर्बल ठरते, असे मला वाटते. तिच्या नवऱ्याची मानसिकता तशी नसेल तरी हे घडतेच. या सगळ्याला आपल्याकडील लग्नसंस्थेची सदोष रचना कारणीभूत आहे, असे कल्कीने म्हटले आहे. तसेच मी पुन्हा लग्न करेन, असे वाटत नसल्याचेही कल्कीने सांगितले.
कल्की आणि अनुराग कश्यप २०११ साली विवाहबद्ध झाले होते. यानंतर २०१५ मध्ये दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले होते.