नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्रपटाचा फर्स्ट लूक सोमवारी प्रदर्शित झाला. अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारत आहे. 'सरबजीत' आणि 'मेरी कोम' या चित्रपटांचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी 'पीएम नरेंद्र मोदी' (PM Narendra Modi)' चे दिग्दर्शन केले आहे.
मुंबईत झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फर्स्ट लूकचे अनावरण करण्यात आले. हा चित्रपट २३ भाषांत प्रदर्शित होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून 'पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)' चे चित्रीकरण सुरु होते.
Vivek Anand Oberoi [Vivek Oberoi] to star in Narendra Modi biopic, titled #PMNarendraModi... The first look poster was launched in 23 languages by Maharashtra CM Devendra Fadnavis... Directed by Omung Kumar... Produced by Suresh Oberoi and Sandip Ssingh. pic.twitter.com/K0HdjhFVtj
— taran adarsh (@taran_adarsh) January 7, 2019
सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते परेश रावल या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही भूमिका विवेक ओबेरॉय साकारणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, 'पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)' फर्स्ट लूक समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
याशिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाविषयी राजकीय वर्तुळातही बरीच उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आधारित 'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गांधी घराण्याविषयी करण्यात आलेल्या टिप्पणीवरून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. त्यामुळे 'पीएम नरेंद्र मोदी' मध्ये काय पाहायला मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.