रजनीकांत यांचा सुपरस्टार होण्याचा प्रवास आणि महानायक अमिताभ यांच्याशी मैत्री...

अमिताभ बच्चन आणि दक्षिण सुपरस्टार रजनीकांत यांची मैत्री खूप घट्ट आहे.

Updated: May 12, 2021, 10:23 PM IST
रजनीकांत यांचा सुपरस्टार होण्याचा प्रवास आणि महानायक अमिताभ यांच्याशी मैत्री...

मुंबई : सर्वांनाच ठाऊक आहे की बीग बी अमिताभ बच्चन आणि दक्षिण सुपरस्टार रजनीकांत यांची मैत्री खूप घट्ट आहे. या दोघांनीही अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम केलेले चित्रपट लोकांना पहायला फार आवडतात. या चित्रपटांमध्ये 'अंधा कानुन', 'अरेस्ट' आणि 'हम' यांचा समावेश आहे. पण हे दोन दिग्गज मित्र कसे बनले? याबद्दल बरेच किस्से आहेत. बीग बींचे जे हिंदी चित्रपट हिट होतात त्या चित्रपटांच्या तामिळरीमेकमध्ये रजनीकांत दिसतात

तामिळमध्ये हिंदी चित्रपटांचे रिमेक बर्‍यापैकी हिट ठरले आहेत आणि यामुळेचं लोक रजनीकांतला खूप पसंतही करू लागले. अमिताभ बच्चन यांचा 'अमर अकबर अँथनी' हा चित्रपट 1977 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पुढच्या वर्षी 'शंकर सलीम अँड सायमन' हा चित्रपट तामिळमध्ये आला.

या चित्रपटात विजय कुमार यांनी शंकरची भूमिका साकारली होती, जयगणेशने सलीमची भूमिका साकारली होती तर रजनीकांत यांनी सायमनची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला तमिळ प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला हा चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट ठरला.

1978 मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' चित्रपटाने यशाचे सगळे विक्रम मोडले. याच्या दोन वर्षांनंतर, तामिळमध्ये एक चित्रपट आला होता, त्यांचं नाव होतं 'बिल्ला'. या चित्रपटात रजनीकांत यांनी बिल्लाची भूमिका साकारली होती.

तमिळ सिनेमा 'बिल्ला'मध्ये 'डॉन' चित्रपटाचे सीन अगदी तसेच्या तसे दाखवण्यात आले होते. या सिनेमातील खास गोष्ट म्हणजे, डॉनमध्ये दिसलेल्या हेलन तमिळ मधील बिल्लामध्येही दिसल्या होत्या

1975 मधील प्रसिद्ध सिनेमा 'दीवार' या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. हा देखील चित्रपट तामिळमध्ये पुन्हा तयार करण्यात आला होता आणि या सिनेमाचं नाव होतं 'थी'. हा चित्रपट 1980 साली रिलीज झाला होता.

या चित्रपटात रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांची विजय ही व्यक्तीरेखा साकारली होती. दिवारमधील शशी कपूर यांची भूमिका अभिनेता शर्मनने साकारली होती. या चित्रपटाचं प्रेक्षकांनीही खूप कौतुक केलं.

यश चोप्रा दिग्दर्शित 'त्रिशूल' हा चित्रपट 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता. तमिळमध्ये या चित्रपटाचा रिमेक 1985 साली 'मिस्टर भारत' या नावाने रिलीज झाला. या चित्रपटाला तमिळ बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

याचप्रमाणे, अमिताभ बच्चन यांच्या 'मर्द' चित्रपटाचाही तमिळ रिमेक तयार करण्यात आला होता. मर्द या सिनेमाच्या तमिळ रिमेकचं 'मावीरन' असं होतं आणि नेहमीप्रमाणेच अमिताभ बच्चन यांचं रोल रजनीकांत यांनी साकारला होता.

त्याचप्रमाणे, अमिताभ बच्चन यांच्या 'कसमे वादे' 'खून पसीना' आणि 'नमक हलाल' या चित्रपटाचांही तामिळ भाषेत रीमेक करण्यात आला होता. या चित्रपटांमध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसले होते.

दोन भाषांमध्ये एकाच भूमिकेत दिसलेल्या या दोन महान कलाकारांना त्यांच्या चित्रपटांच्या भूमिकांमुळे खूप लोकप्रियता मिळाली आणि हे दोन महान कलाकार त्यांच्या पात्रांमुळे एकमेकांच्या जवळ आले.