'अ‍ॅनिमल' चित्रपट फ्लॉप करण्याचा प्रयत्न? रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी धक्का

रणबीर कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाला पायरसीचा सामना करावा लागत आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चित्रपट लीक झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 1, 2023, 12:53 PM IST
'अ‍ॅनिमल' चित्रपट फ्लॉप करण्याचा प्रयत्न? रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी धक्का title=

चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेला 'अ‍ॅनिमल' चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटाने ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली होती. दरम्यान चित्रपट रिलीज होताच लीक झाला आहे. पायरसीचा फटका 'अ‍ॅनिमल' चित्रपटाला बसलेला असून ऑनलाइन लीक झाला आहे. 

'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डीने केलं आहे, कबीर सिंगनंतर हा त्याचा दुसरा बॉलिवूड चित्रपट आहे. रणबीर कपूरचा अॅक्शन अवतार आणि बॉबी देओलची नकारात्मक भूमिका यामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. हा चित्रपट लांबीत मोठा असून, आज सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 

दरम्यान, चित्रपट रिलीज होण्याच्या काही तास आधीच ऑनलाइन लीक झाला आहे. टेलिग्राम प्लॅटफॉर्म आणि इतर पायरेटेड वेबसाईट्सवर हा चित्रपट डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे चक्क एचडी क्वालिटीमध्ये हा चित्रपट उपलब्ध आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठा फटका बसू शकतो. 

बॉलिवूडसह सर्वच चित्रपटसृष्टीतील निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक यांना पायरसीचा सामना करावा लागत आहे. याविरोधात त्यांनी अनेकदा आवाज उठवत कायदेशीर कारवाईची मागणी केली. मुंबई पोलिसांकडे अनेकदा तसे अर्जही देण्यात आले आहेत. पण पायरसीला आळा घालणं अद्यापही शक्य झालेलं नाही. रिलीज झाल्यानंतर काही दिवसातच हे चित्रपट लोक मोबाईलवर पाहताना दिसतात. अनेकदा अभिनेतेही प्रेक्षकांना पायरसीला प्रोत्साहन न देण्याची विनंती करतात. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. 

अ‍ॅनिमल चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ट्रेलरवरुन हा चित्रपट मुलगा आणि बापाच्या नात्यावर भाष्य करत असल्याचं दिसत आहे. वडिलांना आपला अभिमान वाटावा यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकणारा मुलगा यात दाखवण्यात आला आहे. अनिल कपूरने बापाची तर रणबीर कपूरने मुलाची भूमिका निभावली आहे. रश्मिका रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉबी देओल प्रमुख व्हिलन आहे, ज्याच्या मागावर रणबीर कपूर आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x