मुंबई : गोलमाल, हंगामा या चित्रपटातील अभिनेत्री रिमी सेन पुन्हा एकदा वेगळ्या रूपात आपल्या समोर येणार आहे. अभिनेत्री नव्हे तर नेता म्हणून ती आता सक्रिय होणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय जनता पक्षात (बीजेपी) तिने प्रवेश केला. अभिनय सोडून थेट राजकारणात येण्याचा हा निर्णय तिने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रेरित होऊन घेतल्याचे समजते.
खरंतर अभिनेत्रींचा राजकारणातील प्रवेश काही नवीन नाही. यापूर्वी देखील अनेक अभिनेते, अभिनेत्री याकडे वळल्या आहेत. आता त्यांच्या यादीत रिमी सेन हे नाव देखील जोडले गेले आहे.
हाती आलेल्या रिपोर्टनुसार लावरच रिमी निवडणूक लढवणार आहे. काही दिवसापूर्वीच पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने रिमीला राजकारणात सक्रिय होण्याची विनंती केली. या विनंतीचा मन राखून तिने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही काळापासून रिमी चित्रपटांमधून गायब झाली आहे. २०११ मध्ये आलेल्या ‘शागिर्द’ हा तिचा अखेरचा चित्रपट होता. त्यानंतर ती ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकली. शोमध्ये ती आपला प्रभाव दाखविण्यात अपयशी ठरली.