मुंबई: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत ऋषी कपूर यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाने अनेक भूमिका अजराअमर केल्या.अवघ्या तीन वर्षांचे असताना ऋषी कपूर यांनी 'श्री ४२०' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले होते. तर राज कपूर दिग्दर्शित 'मेरा नाम जोकर'मधील त्यांची भूमिका विशेष गाजली.
'मी उध्वस्त झालोय'; लाडक्या 'अकबर'च्या एक्झिटने बिग बींना हादरा
मात्र, 'बॉबी' या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाने ऋषी कपूर यांना एका रात्रीत लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. 1973 मध्ये आलेल्या या चित्रपटामुळे ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाले होते.
यानंतर ऋषी कपूर यांनी 'कर्ज', 'खेल खेल मे', 'अमर अकबर अँथोनी', 'लैला मजनू', 'नगिना', 'सागर', 'हम किसीसे कम नही', 'चांदनी', 'दामिनी दो दुनी चार' या चित्रपटांमधून एकाहून एक असा सरस भूमिका साकारल्या.
आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात ऋषी कपूर यांनी चरित्र अभिनेते म्हणून ओळख मिळवली. 'हम तुम', 'लव्ह आज कल', 'अग्निपथ', 'कपूर अँण्ड सन्स', 'D Day', '१०२ नॉट आऊट' या चित्रपटांतील त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. इम्रान हाश्मीसोबतचा 'द बॉडी' हा ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांनी 'द इंटर्न' या हॉलिवूडपटाचा रिमेक करणार असल्याचे जाहीर केले होते. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार होती.