रणवीर सिंगविषयी शाहरुखनं केलेली भविष्यवाणी ठरली खरी!

शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Jul 30, 2022, 06:45 PM IST
रणवीर सिंगविषयी शाहरुखनं केलेली भविष्यवाणी ठरली खरी! title=

मुंबई :  सध्या बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रणवीरनं पेपर मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करून खळबळ उडवून दिली होती. त्यावरून काही लोकांनी त्याचा विरोध केला तर काही लोक त्याच्या समर्थनाथ पुढे आले. रणवीरनं नुकतेच पेपर मॅगझिनसाठी हे बोल्ड फोटोशूट केले. 'अश्लीलता कायदा' 67(A) अंतर्गत त्याच्याविरुद्ध मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणाची त्वरीत दखल घेत रणवीरवर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने रणवीर सिंगच्या या प्रकरणाचा अंदाज आधीच वर्तवला होता.

शाहरुखनं काही वर्षांपूर्वी रणवीरसाठी ही गोष्ट सांगितली होती की तो अशा परिस्थितीमध्ये पुढे जाऊन अडकणार आहे. खरतरं ही ५ वर्ष जुनी गोष्ट आहे. जेव्हा शाहरुख अभिनेत्री आलिया भट्टसोबत चित्रपट निर्माता करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या पाचव्या सीझनमध्ये पोहोचला होता. तेव्हा त्याने रणवीर सिंगबद्दल एक भविष्यवाणी केली होती, जी आता खरी ठरताना दिसत आहे. जेव्हा त्याने करणच्या चॅट शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये 'रणवीर सिंग कपड्यांमुळे अडचणीत येईल' असे सांगितले होते.

'कॉफी विथ करण' दरम्यान रणवीर सिंगच्या फॅशन सेन्सबद्दल बोलताना करणने शाहरुख खानला विचारले, 'रणवीर सिंगला अटक झाल्याचे कधी ऐकलं आहे का? करणच्या या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुखनं गंमतीत म्हटले की, 'कपडे घालण्यासाठी आणि न घालण्यासाठी नक्कीच होऊ शकते.' तर 5 वर्षांनंतर शाहरुखची ही भविष्यवाणी अगदी खरी असल्याचे दिसते. रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटमुळे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्याचा न्यूड फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यासोबतच रणवीरला सोशल मीडियावरही ट्रोलचा सामना करावा लागला आहे. लोक त्याच्या फोटोवर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवताना दिसत आहेत. त्याचबरोबर महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप अभिनेत्यावर करण्यात आला आहे. अनेक मोठे सेलिब्रिटीही रणवीरला पाठिंबा देत पुढे आले आहेत. मात्र, खुद्द रणवीर सिंगनं या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या फोटोशिवाय रणवीर त्याचा आगामी 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. त्याचबरोबर शाहरुख खान 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.