Shahrukh Khan ISRO Scientist Viral Video: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला 2023 हे वर्ष फारच लकी ठरलं. शाहरुखचे 'पठाण', 'जवान' हे चित्रपट सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी ठरले. याच निमित्ताने शाहरुख नुकताच एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाला होता. खरं तर शाहरुख तब्बल 5 वर्षानंतर एखाद्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. शाहरुखला इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात आला. याच सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी शाहरुखचं कौतुक केलं आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ हा पुरस्कार सोहळ्यामध्ये पुरस्कार प्रदान करुन झाल्यानंतर घडलेल्या प्रसंगाचा आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे वैज्ञानिक पालानिवेल विरामुथ्थूवेल यांना शाहरुखने दिलेली वागणूक चर्चेचा विषय ठरतेय. पालनिवेल यांनी चंद्रयान-3 मोहिमेचे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. या कार्यक्रमात ते शाहरुखबरोबर स्टेजवर होते. फोटोसाठी सर्व मान्यवर एकत्र येत असतानाच पालनिवेल यांनी स्वत:ची केंद्रस्थानी असलेली जागा शाहरुखला देऊ केली आणि ते मागील रांगेत उभे राहण्यासाठी जात होते. मात्र त्यावेळी शाहरुखने त्यांच्याबरोबर जे काही केलं ती कृती सध्या चर्चेत आहे.
पुरस्कार प्रदान करुन झाल्यानंतर कार्यक्रम संपत असताना पाहुण्यांबरोबर अनेकजण फोटो काढण्यासाठी स्टेजवर आले. शाहरुख खान फोटोसाठी स्टेजवर आला तेव्हा पालानिवेल विरामुथ्थूवेल बाजूला सरकले आणि त्यांनी आपली जागा शाहरुखला देऊ केली. पालानिवेल विरामुथ्थूवेल हे फार लाजाळू असून त्यांना प्रकाशझोतात आणि ते ही शाहरुखच्या बाजूला उभं राहणं अवघडल्यासारखं होईल असं वाटल्याने त्यांनी जागा देऊ केल्याचा अंदाज काहींनी व्यक्त केला. मात्र शाहरुखने अगदी ते नाही नाही म्हणत असतानाही त्यांचा हात पकडून ठेवला आणि त्यांना मागील रांगेत जाऊ दिलं नाही. शाहरुखने पालानिवेल विरामुथ्थूवेल यांना आपल्या बाजूला उभं करुन फोटो काढून घेतला. हाच व्हिडीओ व्हायरल झालाय.
पालानिवेल विरामुथ्थूवेल यांच्यासाठी शाहरुखने दाखवलेल्या या सन्मानाबद्दल त्याच्यावर सध्या कौतुक्चा वर्षाव होताना दिसतोय. शाहरुखचा व्हायरल व्हिडीओ पाहून या अशा छोट्या छोट्या गोष्टी व्यक्तीला मोठं बनवतात असं एकाने म्हटलं आहे. अन्य एकाने म्हणूनच शाहरुख सारखं कोणीच नाही असं म्हटलंय.
Such small gestures from this man just makes u love him more.
Isro scientist Dr. palanivel veeramuthuvel moved away to make space for Shahrukh Khan
And Shahrukh pulled him back and took a picture together pic.twitter.com/lZIQ7An4b0— Yogi Baba Productions (@yogibabaprod) January 13, 2024
हे सारं घडलं तेव्हा मंचावर इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथही उपस्थित होते. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोमनाथ यांना पुरस्कार देताना मस्करीमध्ये त्यांचा उल्लेख 'अंतराळाचे शाहरुख खान' असा केला.