Video : गावखेड्यातील मुलगा ते ग्लोबल स्टार... पंतप्रधानाच्या भेटीला पोहोचला दिलजीत दोसांझ, साधेपणा पाहून चाहते भारावले

Diljit Dosanjh Meets PM Modi: दिलजीतला भेटताच पंतप्रधान मोदी काय म्हणाले? सततच्या परदेशवाऱ्या करणारा दिलजीत भारताविषयी पंतप्रधानांसमोर काय म्हणाला? 

सायली पाटील | Updated: Jan 2, 2025, 12:32 PM IST
Video : गावखेड्यातील मुलगा ते ग्लोबल स्टार... पंतप्रधानाच्या भेटीला पोहोचला दिलजीत दोसांझ, साधेपणा पाहून चाहते भारावले  title=
singer actor dilluminati fame star diljit dosanjh meets pm narendra modi watch video and photos

Diljit Dosanjh Meets PM Modi: पंजाबी सिनेविश्वामध्ये कमालीची प्रसिद्धी मिळवल्यानंतर अभिनयासोबतच गायनाच्या क्षेत्रामध्येही लोकप्रियता मिळवणाऱ्या दिलजीत दोसांझ यानं मागील काही वर्षांमध्ये अविश्वसनीय यश मिळवलं. एक कलाकार म्हणून दिलजीत मोठा होत गेला आणि त्याच्या चाहत्यांचा आकडाही दिवसागणिक वाढतच गेला. 

फक्त भारतच नव्हे, तर परदेशातही लाखोंच्या संख्येनं चाहते असणारा हा सेलिब्रिटी सध्या 'दिल्लुमिनाटी' टूरवर असून, जगभरात विविध ठिकाणी दौरे करत कार्यक्रम सादर करत आहे. लाखोंच्या दरात त्याच्या कॉन्सर्टच्या तिकीटांची विक्रीसुद्धा सुरू आहे. याचदरम्यान त्यानं नुकतंच भारता असतेवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

खुद्द दिलजीत आणि पंतप्रधान मोदी या दोघांनीही आपआपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या भेटीदरम्यानचे काही खास क्षण सर्वांसमोर आणले. या भेटीतील फोटो आणि व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असून, पंतप्रधानांची भेट घेतानाही दिलजीतचा साधेपणाच सर्वांची मनं जिंकून गेला. 

हेसुद्धा वाचा : जगभरातील श्रीमंतांचं महाबळेश्वर; फक्त अब्जाधीशांनाच परवडतो इथं येण्याचा खर्च, कुठंय हे ठिकाण?

 

अतिशय मनापासून पंतप्रधानांशी संवाद साधणं असो किंवा भारत देशाची महती त्यांच्यापुढं मांडणं असो. इतकी प्रसिद्धी मिळूनही एक कलाकार म्हणून दिलजीत कायमच चाहत्यांची मनं जिंकत असतो आणि इथंही त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा गुण पाहायला मिळाला. या खास भेटीसाठी दिलजीतनं काळ्या रंगाच्या पेहरावाला पसंती दिली होती. जिथं त्याची पगडीसुद्धा याच रंगाची होती. तर, पंतप्रधानही करड्या रंगाच्या पेहरावामध्ये या खास भेटीसाठी तयार झाले होते. 

पंतप्रधानांकडून दिलजीतचं कौतुक... 

मोदींनी दिलजीतचा आवाज आणि त्याच्या गायनशैलीचं तोंड भरून कौतुक केलं. 'जेव्हा भारतातील एका गावातील मुलगा जगभरात नाव उज्ज्वल करतो तेव्हा खूप छान वाटतं. तुमच्या कुटुंबानं तुम्हाला दिलजीत हे नाव दिलं आणि तुम्ही सर्वांचीच मनं जिंकत आहात', असं ते म्हणाले. 

या संवादादरम्यान 'मेरा भारत महान' असं अनेकजण म्हणतात. पण, आपल्या दौऱ्यादरम्यान हा देश खरंच किती महान आहे याची महती लक्षात आली असं म्हणत दिलजीतनं या देशाप्रती, चाहत्यांप्रती आणि मिळालेल्या प्रसिद्धीप्रती कृतज्ञतेचा सूर आळवला. या भेटीतील हे सर्व क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, मोठ्या प्रमाणात शेअरही केले जात आहेत.