आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूरः एकीकडे मंगळवारी सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होती. सरत्या वर्षाच्या निरोपासाठी ठिकठिकाणी जल्लोष सुरु होत्या, तर याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातील एका कुटुंबावर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला. इथं झालेल्या एका भीषण अपघातानं क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळ ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी जीव गमावला. या अपघातात मंजुषा सतीश नागपुरे (वय 47) यांचा जागीच मृत्यू झाला. सतीश भाऊराव नागपुरे (वय 51) आणि त्यांची नात माहिरा राहुल नागपुरे या दोन वर्षीय बालिकेचा उपचारासाठी घेऊन जात असतानाच मृत्यू झाला.
नागपुरे कुटुंब वणी तालुक्यातील रासाघोणसा येथील राहिवासी होते. ते भद्रावती येथे आपल्या नातेवाईकाकडे आले होते. दरम्यान शहरालगत असलेल्या नातेवाईकाच्या मालकीच्या हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर हे कुटुंब दुचाकीने आपल्या नातेवाईकांच्या घराकडे परत जात होते. यावेळी महामार्गावर वळण घेत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.
ही दुर्दैवी घटना मंगळवार 31 डिसेंबर 2024 रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. सदर दुर्घटना भद्रावती शहरालगत चंद्रपूर-नागपूर हायवेवरील डॉली पेट्रोल पंपाजवळ घडली. दुचाकीवर आदळलेल्या वाहनाच्या चालकाचं नाव नंदू चव्हाण सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. या अपघाताचं नेमकं कारण काय आहे, हे अद्याप उघड झालेलं नाही, पण ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ट्रकचालक नंदू चव्हाण हा मुळ पुसद येथे राहणारा आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहेत.