मुंबई : अभिनय विश्वात आपला ठसा उमटवल्यानंतर अनेक कलाकारांनी राजकारणाकजडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. भारताच्या रातकारणात अशी बरीच उदाहरणं पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत हीसुद्धा राजकाराणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. याच चर्चांमध्ये आता आमिर खानचं नाव समोर येत आहे. पण, तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
आपण राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताच विचार करत नसल्याचं त्याने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात स्पष्ट केलं.
इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी आणि त्यांची मनं जिंकण्यासाठी आपण चित्रपटांच्याच माध्यमाचा वापर करु असंही त्याने सांगितलं.
'मला राजकीय नेता व्हायचंच नाही. किंबहुना ती माझी वाटच नाही. मी इतरांशी संवाद साधू शकतो, पण मी कोणी नेता नाही. मला तर या साऱ्याची भीतीच वाटते', असं म्हणत राजकारणाची कोणाला भीती वाटत नाही?, असा प्रतिप्रश्नही त्याने केला होता.
आपण एक कलाकार असून कलेच्याच माध्यमातून अनेकांची मनं जिंकू शकतो. त्यातच पुढे जाऊ शकतो, असं म्हणत त्याने राजकारणापासून दूर राहण्यालाच प्राधान्य दिलं.
दरम्यान, आमिर राजकारणाच सक्रिय होण्याच्या कोणत्याची विचारात नसला तरीही तो केंद्र आणि राज्यशासनाच्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये हातभार लावतो. समाजहितासाठीच्या अनेक कामांमध्ये त्याचा सहभाग पाहायला मिळाला आहे. सध्याच्या घडीला बी- टाऊनचा हा परफेक्शनिस्ट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात व्यग्र आहे.