मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या चाहत्यांना खूश ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. तो विमानतळावर असू दे किंवा कोणत्याही कार्यक्रमात, रणवीर अनेकदा त्याच्या चाहत्यांसोबत सेल्फी घेताना, त्यांना भेटताना दिसतो. पण आता एक चाहतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी रणवीरने चाहतीला जबरदस्त सरप्राइजचं दिलं आहे.
रणवीर सध्या लंडनमध्ये त्याच्या आगामी '८३' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. लंडनमध्ये राहणारी किरण, रणवीरची मोठी चाहती आहे. रणवीरला जेव्हा किरण गरोदर असल्याचं समजलं, त्यावेळी त्याने तिला सरप्राइज देण्याचं ठरवलं. किरणने तिच्या सोशल मीडियावर याबाबतची संपूर्ण कहाणीच लिहिली आहे.
आपल्या आवडत्या कलाकाराला भेटल्यानंतर किरणने तिच्या भावना व्यक्त करताना, 'मी स्वयंपाक घरात होती, माझ्या पतीने दरवाजा उघडला. दरवाज्यात रणवीर माझ्याबद्दल विचारत असल्याचा आवाज मला येत होता. मला विश्वासच बसत नव्हता की, रणवीर माझ्या घरी आला आहे' असं त्यांनी सांगितलं.
रणवीरने अशाप्रकारे चाहत्याला सरप्राइज देण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी 'सिंबा' चित्रपटाच्या प्रमोशन वेळीही रणवीरने असंच काहीच केलं होतं. रणवीर मुंबईतील ज्या हॉटेलमध्ये त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन करत होता, तिथेच एका जोडप्याचा विवाहसोहळा सुरु होता. मग काय? रणवीर अचानक या लग्नसमारंभात पोहचला आणि त्याला असं अचानक आलेलं पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला. रणवीरने या जोडप्याला शुभेच्छाही दिल्या होत्या.