मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा झाल्यापासून त्यांच्याविषयीची प्रत्येक गोष्ट ही चर्चेचा विषय ठरत होती. कोणत्या ठिकाणी लग्न होणार इथपासून ते कोणला या विवाहसोहळ्याचं आमंत्रण असणार इथपर्यंत प्रत्येक गोष्टीविषयीचे प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत होते. यात 'दीप-वीर'च्या पेहरावाविषयी तर अनेकांमध्ये कमालीची उत्सुकता होती.
अपेक्षेप्रमाणेच या दोघांनीही सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी याच्या डिझाईन्सना पसंती देत पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवला. पण, आता मात्र दीपिकाच्या लग्नातील एका लूकविषयी वेगळ्याच चर्चा पाहायला मिळत आहेत.
दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केल्यानंतर सब्यसाचीच्या अकाऊंटवरुनही या जोडीचे फोटो पोस्ट करण्यात आले. ज्यामध्ये 'हेड टू टो' सब्यसाची असं म्हणज संपूर्ण लूकमध्ये त्याचीच झलक पाहायला मिळत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
पण, मुळात कोंकणी पद्धतीने पार पडलेल्या दीपिका-रणवीरच्या विवाहसोहळ्यादरम्यानचा पेहराव पाहता त्याविषयी माहिती देण्यात सब्यसाचीकडूनच चूक झाल्याचं लक्षात येत आहे.
कारण, कोंकणी पद्धतीदरम्यानच्या विवाहसोहळ्यादरम्यान, दीपिकाने नेसलेली साडी ही कोणा फॅशन डिझायनरने डिझाईन केली नसून, प्रथेनुसार तिच्या आईकडून तिला ती कांजीवरम साडी देण्यात आली होती. सब्यसाचीकडून फक्त त्यात हलकेसे बदल करण्यात आल्याचं कळत आहे.
खुद्द सब्यसाचीनेच ही बाब लक्षात येताच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित त्यात नमूद केलं की, 'कोंकणी प्रथेनुसार वधूला तिची आई लग्नासाठीची साडी भेट देण्यात येते. आमच्याकडेही सोपवण्यात आलेली ही सा़डी दीपिकाला तिच्या आईकडून म्हणजेच उजाला पदुकोण यांच्याकडून देण्यात आली होती. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूच्या अंगादी गॅलरीया येथून ही साडी खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे या साडीचं संपूर्ण श्रेय हे त्यांचंच आहे.'
यापूर्वी जवळपास वर्षभरापूर्वीही सब्यसाची असाच पेचात सापडला होता. विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या विवाहसोहळ्याच्या वेळी फोटो क्रेडिट न दिल्यामुळे बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. ज्यानंतरही त्याने अशीच पोस्ट लिहित सारवासारव केली होती.