मुंबई : देशामध्ये तणावाखाली काम करणाऱ्या नोकरदारांवर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मुंबईतील लोक सर्वाधिक तणावाखाली काम करत असल्याचे समोर आले आहे. लीब्रेट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मुंबईतील सुमारे ३१ % कामगार तणावग्रस्त असल्याची माहिती हाती आली आहे. देशभरातील मेट्रो शहरातील ६० टक्के लोक हे तणावग्रस्त असल्याची चिंताजनक आकडेवारीही समोर आली आहे.
मुंबईनंतर या यादीत राजधानी दिल्लीचा क्रमांक लागतो. दिल्लीमध्ये २७ टक्के कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत. यानंतर बंगळुरु १४%, हैदराबाद ११%, चेन्नई १०% आणि कोलकाता ७% यांचा क्रमांक लागतो. १० ऑक्टोबर २०१६ ते १० ऑक्टोबर २०१७ या एका वर्षामध्ये लीब्रेटनं करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एक लाख पेक्षा अधिक लोकांचा समावेश होता. यामध्ये त्यांनी अनेक डॉक्टरांची मदत घेतली.
याबद्दल लीब्रेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक सौरभ अरोरा म्हणाले, तणावाखाली असलेले बरेच लोक मित्र किंवा कुटुंबियांशी संवाद साधत नाहीत. तणावात असलेल्या लोकांनी जवळच्या लोकांशी संवाद साधायला हवा. तणावाचे कारण जाणून घ्यायला हवे.
कारण समजल्यावर तणाव दूर करण्यासाठी मार्ग शोधायला हवा. तणाव खूप काळ राहिल्यास गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात, असा धोक्याचा इशारा अरोरा यांनी दिला.