मुंबई : ऋतूमानामध्ये जरा बदल झाला की लगेजच काही व्हायरल इंफेक्शनचा त्रास होतो. सर्दी, खोकला, घसा दुखणं हा त्रास संभवणं अगदी स्वाभाविक आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू झाल्यावर वातावरणात होणारा बदल अनेक संसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरतो. अशावेळेस अॅन्टीबायोटिक्सवर अवलंबून राहण्यापेक्षा काही घरगुती उपायांच्या मदतीने मात करता येऊ शकते.
सर्दीमुळे घशात होणारी खवखव कमी करण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरतात. मीठाच्या पाण्यामुळे नाक, घसा मोकळा होण्यास मदत होते.
कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. यामुळे तोंडातील इंफेक्शानचा धोकादेखील कमी होतो.
मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील अॅसिडचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
घशामध्ये साचलेला कफ, त्यामुळे होणार्या वेदना कमी करण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरतात. श्वासनलिकेला होणारा त्रास, सूजदेखील कमी करण्यास मदत होते. त्यामुळे खूप प्रमाणात सर्दी झाली असल्यास मीठाच्या पाण्याने गुळण्या करा यामुळे चोंदलेलं नाकही मोकळं होण्यास मदत होते.
तोंडाला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठीदेखील मीठाच्या पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरू शकतात. मीठाच्या पाण्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे इंफेक्शन कमी होण्यास सहज मदत होते.