चहा की कॉफी? काय पिणं जास्त फायद्याचं? 99 टक्के लोक देतात चुकीचं उत्तर

जगभरातील लोकांना चहा (Tea) किंवा कॉफीचं (Coffee) सेवन करायला फार आवडतं. अनेक लोकांचा दिवस चहाचा घोट घेतल्याशिवाय सुरु होत नाही. पण चहा आणि कॉफी पिणाऱ्यांमध्ये मतांतर असून आपण घेतो तोच पेय उत्तम असल्याचा दावा ते नेहमी करत असतात. जाणून घ्या याचं नेमकं उत्तर  

शिवराज यादव | Updated: Jan 25, 2024, 11:33 AM IST
चहा की कॉफी? काय पिणं जास्त फायद्याचं? 99 टक्के लोक देतात चुकीचं उत्तर title=

चहा आणि कॉफी हे जगभरातील लोकांचं आवडतं पेय आहे. चहा आणि कॉफीचे आपापले चाहते आहेत. चहाचं वेड फक्त भारतापुरतं मर्यादित असून, अनेक देशांमधील लोक आवडीने त्याचं सेवन करतात. पण यासह कॉफी पिणाऱ्यांची संख्याही तितकीच आहे. जगातील कोट्यावधी लोकांचा दिवस चहाचा घोट घेतल्याशिवाय सुरु होत नाही. याचं कारण चहाचा घोट घेतल्याशिवाय फ्रेशच वाटत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. दुसरीकडे कॉफी पिणाऱ्यांचा काही वेगळा दावा नाही. पण चहाप्रेमी आणि कॉफीप्रेमी यांच्यात नेहमीच आपलं पेय उत्तम असल्यावरुन वाद होत असतात. आपलं पेय आरोग्यासाठी जास्त चांगलं असल्याचं त्यांचं म्हणणं असतं. 

पण अनेक लोकांना चहा आणि कॉफी यांच्यातील कोणतं पेय जास्त फायद्याचं आहे याची माहिती नाही. हा प्रश्न तसा फारच कठीण आहे. कारण यावरुन फक्त सर्वसामान्यच नाही तर आरोग्यतज्ज्ञांमध्येही मतांतर असल्याचं दिसून येतं. आज जाणून घेऊयात नेमकं या प्रश्नाचं उत्तर काय आहे. 

वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, चहा आणि कॉफीसंबंधी अनेक अभ्यास करण्यात आले असून यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. एका अभ्यासानुसार, कॉफीमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं, तर चहामध्ये अजिबात नसतं. फायबर पचनयंत्रणेसाठी फार महत्त्वाचं असतं. कॉफीच्या एका कपात जवळपास 1.1 ते 1.8 ग्रॅम फायबर असतं. कॉफीत संत्र्याच्या ज्यूसपेक्षा जास्त फायबर असतात. त्यामुळे याबाबतीत कॉफी चहापेक्षा उत्तम आहे. पण या एका मुद्द्यावर कॉफी चहापेक्षा उत्तम आहे असं ठरवलं जाऊ शकत नाही. 

कॅफीनबद्दल बोलायचं गेल्यास दोघांमध्ये ते चांगल्या प्रमाणात असतं. एक कप कॉफीत जवळपास 100 मिलीग्रॅम तर एक कप चहात जवळपास 50 मिलीग्रॅम कॅफीन असतं. कॅफीनचं सेवन कमी प्रमाणात केल्यास ते शरीराला ऊर्जा देऊ शकतं. यामुळे लोकांचा मूड चांगला होऊ शकतो. तसंच मानसिक आरोग्यासाठीही ते चांगलं मानलं जातं. पण कॅफीनचं अधिक सेवन करणं नुकसान पोहोचवू शकतं. मायोक्लिनिकच्या रिपोर्टनुसार, दिवसाला 400 मिलीग्रॅमपर्यंत कॅफीनचं सेवन करणं सुरक्षित मानलं गेलं आहे. अशा स्थितीत रोज 1-2 कप कॉफी किंवा चहा प्यायल्याने काही नुकसान होत नाही. 

अनेक अभ्यासांनुसार, चहा आणि कॉफी दोन्ही ह्रदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक मानण्यात आलं आहे. या दोन्हींचं सेवन केल्याने ह्रदयाचे आजार आणि स्ट्रोक यांचा धोका कमी होतो. 

कॉफी आणि चहात अँटीऑक्सिडेंट आणि पॉलिफेनॉल्स असतात, जो कार्डियोवॅस्कुलर आरोग्याला उत्तम ठेवतात. ह्रदयाचा विचार केल्यास चहा आणि कॉफी दोघांनाही लाभदायक मानण्यात आलं आहे. याशिवाय कॉफीला फायबर, मायक्रोबायोम आरोग्यासाठी चांगलं मानण्यात आलं आहे. तसंच कॉफी प्यायल्याने डायबेटिज आणि कॅन्सरचा धोका कमी होतो. दुसरीकडे चहा प्यायल्याने ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि मानसिक आरोग्य चांगलं होतं असा दावा आहे. 

थोडक्यात सांगायचं झाल्यास कॉफीचं जास्त फायदे आहेत. पण चहाच्या फायद्यासंबंधी संशोधन कमी झालं असून अधिक अभ्यासाची गरज आहे.