किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी किती पाणी प्यावं?

पुरेसे पाणी न पिणे हे किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचा त्रास जडण्यामागील एक प्रमुख कारण आहे. पाण्याव्यतिरिक्तदेखील इतर पाणीदार भाज्या, हेल्दी ड्रिंक्स, फळं यांचा आहारात पुरेसा समावेश करणे आवश्यक आहे.यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Updated: Mar 22, 2018, 08:33 PM IST
किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी किती पाणी प्यावं? title=

मुंबई : पुरेसे पाणी न पिणे हे किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचा त्रास जडण्यामागील एक प्रमुख कारण आहे. पाण्याव्यतिरिक्तदेखील इतर पाणीदार भाज्या, हेल्दी ड्रिंक्स, फळं यांचा आहारात पुरेसा समावेश करणे आवश्यक आहे.यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

प्यायलेल्या पाण्यातून नियमित दोन लीटर मूत्राची निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यामधून घातक घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते. परिणामी किडनीचे आरोग्य सुधारण्यासोबतच टाकाऊ घटक साचून राहण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे किडनीप्रमाणेच आरोग्यदेखील सुधारते. 

किडनीस्टोनचा  त्रास टाळण्यासाठी नियमित किती लीटर पाणी पिणे आवश्यक आहे ?

युरो-ऑन्कोलॉजिस्ट (लिलावती, सैफी , ब्रीच कॅन्डी) डॉ. अनूप रामाणी यांच्या सल्ल्यानुसार, किडनी स्टोनचा त्रास होऊ नये म्हणून नियमित 6-8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. किडनी स्टोनचा त्रास असल्यास तो पुन्हा होऊ नये म्हणून किमान 3 लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.

माणसाला आवश्यक असणार्‍या पाण्याची गरज अनेक निकषांवर अवलंबून असते. यामध्ये शारिरीक कष्ट, हवामान आदींचा समावेश असतो. पाणी प्यायल्याने मूत्र निर्मितीचे प्रमुख काम होते. जर मूत्र निर्मिती कमी असेल म्हणजेच जर तुम्ही दिवसातून 1-2 वेळेस बाथरूममध्ये जात असाल तर तुम्हांला अधिक पाणी पिण्याची गरज आहे. तसेच सतत मूत्र विसर्जनाची इच्छा होणेदेखील त्रासदायक आहे. सतत मूत्रविसर्जन होणे हे मधूमेह,प्रोस्टेटच्या आजारांचे लक्षण आहे. 

दिवसभरात 4-5 वेळेस मूत्रविसर्जन करणे सामान्य आहे. मात्र पाणी पिण्याची इच्छा टाळू नका. पाण्यासोबत फळांचा रस, लिंबूपाणी देखील फायदेशीर ठरते. नुसतेच पाणी पिणे कंटाळवाणे वाटत असल्यास ‘ इन्फ्यूज्ड वॉटर’ प्या. यामध्ये तुम्ही आवडीनुसार स्वादाची निवड करू शकता. त्यामुळे डीहायड्रेशन तसेच किडनीस्टोनच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होईल.