मधुमेहाचा अनेक अवयवांवर परिणाम होतो. डोळेही त्याला अपवाद नाहीत आणि भारतात ही वेगाने वाढत जाणारी आरोग्य समस्या आहे. याची लक्षणे लवकर ओळखणे आणि डोळ्यांची नियमित तपासणी करणे मधुमेहींसाठी आवश्यक आहे, जेणेकरून संभाव्य गुंतागुंत टाळता येऊ शकेल. मधुमेहाचा डोळ्यांवर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो आणि त्याला प्रतिबंध कशा प्रकारे करता येऊ शकतो याचे मार्ग डॉ. अग्रवालस् डोळ्यांचे हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड, पुणे येथील मोतीबिंदू सर्जन, सामान्य नेत्ररोग, मेडिकल रेटिना सेक्शनचे डॉ. सोनल इरोळे यांच्याकडून जाणून घेऊयात.
मधुमेहामुळे डोळ्यांच्या अनेक ऊतींना नुकसान पोहोचू शकते. परिणामी, डायबेटिक रेटिनोपथी किंवा मोतिबिंदू यासारखे आजार उद्भवू शकतात.
मधुमेह नसलेल्यांच्या तुलनेने मधुमेहींमध्ये मोतिबिंदू होण्याचे प्रमाण अधिक असते. या मोतिबिंदूची तीव्रताही जलद वेगाने वाढते. मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करताना संसर्गाची जोखीम अधिक असल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी असेल तेव्हाच ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात येतो.
मधुमेहामध्ये डोळ्यातील रेटिना या भागावर सर्वाधिक परिणाम होतो. रेटिनामध्ये होणारा रक्तस्त्राव, रेटिनाच्या ऊतींना सूज येणे आणि नाजूक रक्तवाहिन्यांची वाढ होणे, ज्यातून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. ही लक्षणे उच्च रक्तशर्करेमुळे लहान रक्तवाहिन्यांना होणाऱ्या नुकसानाची चिन्हे आहेत. रेटिनाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला तरी तुमची दृष्टी सामान्य राहू शकत असल्याने मधुमेहींना त्यांच्या रेटिनामधील बदल लक्षात येईलच, असे नाही.